डोंबिवली : डोंबिवली जवळील रिजन्सी अनंतम गृहसंकुलात राहत असलेल्या कोमल महेश भोईर यांच्या सात वर्षाच्या बालकाची शुक्रवारी सकाळी शाळेत जात असताना दोन कोटी रूपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. मानपाडा पोलिसांनी तत्पर तपास करून मोठ्या कौशल्याने शहापूर जवळून अपहृत बालकाची सुटका केली. याप्रकरणात चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे.
या बालकाला शाळेत सोडणाऱ्या वीरेन पाटील (२५) या रिक्षा चालकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाले. मुलाचे वडील महेश भोईर विकासक आहेत. या मुलाचे अपहरण करून त्याला जीवे ठार मारण्याची धमकी भोईर कुटुंबीयांना दिली तर आपणास दोन कोटी रूपये सहज मिळतील असा विचार करून अपहरणकर्त्यांनी या बालकाचे अपहरण केले होते, असे पोलीस तपासात पुढे आले आहे.
शुक्रवारी सकाळी साडे सात वाजता कोमल महेश भोईर यांचा मुलगा रिक्षेने शाळेत जाण्यासाठी निघाला. कोमल भोईर यांना अपहरणकर्त्यांनी दोन कोटी रुपये द्या, अन्यथा मुलाला ठार मारू, अशी धमकी त्यांच्या संपर्क क्रमांकावर दिली. मुलाचे अपहरण झाल्याचे समजताच हादरलेल्या भोईर यांनी तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने याने घडला प्रकार सांगितला. हे प्रकरण नाजूक असल्याने उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे कादबाने यांनी पोलिसांची पाच तपास पथके तयार करून वेगळ्या दिशांना त्यांना पाठविले.
मुलाला शाळेत सोडणारा वीरने पाटील याने हे कृत्य केल्याचा संशय घेऊन पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे वीरेनचा माग पथकांनी काढला. तो मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूर परिसरात असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांच्या पथकांनी शहापूर भागात वीरेनचे ठिकाण शोधून त्याला बालकासह ताब्यात घेतले. मुलाच्या जीवाला धोका म्हणून पोलिसांनी या प्रकरणात अतिशय सावधगिरी बाळगली होती. मुलाचे वडील विकासक आहेत. आपल्याला दोन कोटी रूपये सहज मिळतील, असा विचार रिक्षा चालक वीरेन पाटीलने केला होता. त्याचा डाव पोलिसांनी साडे तीन तासाच्या आत उधळला.
बालकाला पोलिसांनी सुखुरूपपणे अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोडवून त्याचा ताबा पालकांना दिला. याप्रकरणात पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. एक रिक्षा, एक चाकू जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या विरुध्द खंडणी, अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, साहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे, संपत फडोळ, अभिजीत पाटील, स्वाती जगताप, हवालदार सुनील पवार, राजेंद्र खिल्लारे, बाबा जाधव, संजू मसाळ, शिरीष पाटील, विकास माळी, सचिन साळवी, सुशांत पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.