डोंंबिवली: राज्यातील आजुबाजुची शहरे स्मार्ट म्हणून नावारूपाला येत आहेत. मुंंबई, ठाण्याच्या वेशीवरील सुसंस्कृत, उच्चशिक्षितांंचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोशिक डोंबिवलीकरांनी खड्डे, अरूंद रस्ते, सततची वाहन कोंडी, दर दोन वर्षांनी होणारे कंंपन्यांचे स्फोट, त्यात जाणारे हकनाक जीव आणि अनेक समस्यांवर वेळीच आवाज उठविला नाहीतर एक भ्याड नागरिकांंचे शहर म्हणून डोंबिवली शहरावर शिक्का बसेल, असा जनजागृती करणारा संंदेश शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या डोंबिवलीतील उंबार्ली येथील विद्यानिकेतन शाळेने आपल्या शाळेच्या बसवर लावून सोशिक डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लोकसत्ता’ने बुधवारी अग्रलेखातून डोंबिवलीकरांच्या सोशिक वृत्तीवर प्रहार करून सुसंस्कृत डोंबिवलीकरांनी शहराला उच्चवर्णीयांची झोपडपट्टी असे बिरूद चिकटू नये यासाठी प्रयत्न करण्याचे गरज असल्याचे सूचित केले आहे. या विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे. आता विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित यांनी समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या डोंबिवलीकरांना आपल्या शहरातील नागरी आणि इतर समस्यांवर परखड, उघडपणे बोलायला शिका, यासाठी पुढे या, असा संदेश आपल्या शालेय बसच्या पाठीमागे लावलेल्या फलकातून देण्याचा प्रयत्न केला आहे. अशाप्रकारचे विविध विषयांवरील जनजागृतीचे फलक वर्षभर विद्यानिकेतन शाळेकडून लावले जातात.

हेही वाचा : ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील विजेचा लपंडाव कायम, सततच्या वीज खंडित होण्याच्या प्रकाराने रहिवासी हैराण

फलकातील मजकूर

ही सहनशीलता नाही तर भ्याडपणा आहे. खराब, रखडलेले रस्ते, बेछुट वाहनचालक, सार्वत्रिक अस्वच्छता, अपुरा, अनियमित पाणी, वीज पुरवठा, शहरात पालिका प्रशासन आहे की नाही अशा काळोख्यात उभी राहत असलेली बेसुमार बेकायदा बांधकामे, फेरीवाल्यांनी व्यापलेले शहरातील रेल्वे स्थानक, मुख्य रस्ते, चौक, पालिकेकडून इमारत बांधकाम परवानग्या देताना प्रीमिअम भरणा केला यो गोंडस नावाखाली इमारतींच्या तळाचे वाहनतळ रद्द करून तेथे विकासकांना सदनिका बांधण्यास देण्यात येत असलेली परवानगी, अशाप्रकारे लोकांना आणि वाहनांना टांगून ठेवण्याची ‘टेंगळे’ वृत्ती, मृत्युगोलाप्रमाणे प्रवाशांनी भरभरून जाणाऱ्या लोकल्स, दर दोन वर्षांनी होणारे कंपन्यांचे सफोट, या आणि अशा अनेक विषयांवर कधीतरी उघडपणे बोलण्यास, आपल्या समस्या मांडण्यासाठी पुढे येणार की नाही. आपल्या शहराचे नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीला कधी जाब विचारणार की नाही, एमआयडीसी आणि निवासी भागाला संरक्षित करणारा बफर झोन कोणत्या राजकारण्याने खाल्ला. या स्फोटामुळे होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी या बफर झोन खाणाऱ्यांची नाही का. त्यांना काय शिक्षा होणार, या विषयांवर सुशिक्षित डोंबिवलीकर आता काही बोलले नाहीत तर एक भ्याड नागरिकांचे शहर म्हणून आपल्यावर शहरावर शिक्का बसेल. तेव्हा वेळीच जागृत व्हा, असे आवाहन या फलकाव्दारे विद्यानिकेतन शिक्षण संस्थेकडून करण्यात आले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dombivli social awareness message poster on vidya niketan school bus dombivli after chemical company blast css