डोंबिवली : ठाकुर्लीतील चोळेगाव भागात गुरुवारी दुपारी एका भरधाव वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार ते पाच वाहनांना धडक दिली. या धडकेत वाहनांचे नुकसान झाले असून मोटार चालक गंभीर जखमी झाला आहे. दुपारच्या वेळी हा अपघात झाला. त्यावेळी रस्त्यावर गर्दी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
मयुरेश करण राजूपत असे आरोपी मोटार चालकाचे नाव आहे. तो डोंबिवलीतील सावरकर रस्ता भागात राहतो. वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी चोळेगावातील रहिवासी श्रीकांत बागड यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. चोळेगाव हा सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. रस्त्यावर गर्दी असते. दुपारची वेळेत हा अपघात झाला. त्यावेळी गर्दी नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
हेही वाचा : डोंबिवलीत मासळी बाजार बंद
पोलिसांनी सांगितले, सावरकर रस्ता भागात राहत असलेला आरोपी मोटार कार चालक मयुरेश राजपूत त्याची कार घेऊन चोळेगावातील अरूंद रस्त्यावरून भरधाव जात होता. चोळेगावातील स्टेट बँक शाखेसमोरील रस्त्यावर त्याची कार येताच त्याचा मोटारीवरील ताबा सुटला. मोटारीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार ते पाच वाहनांना धडक देऊन त्या वाहनांचे नुकसान केले. त्याच बरोबर मयुरेशच्या मोटारीचे नुकसान होऊन त्याला धडकेत जोराचा मार लागल्याने तोही जखमी झाला.