डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ आंबे विक्रीचा मंच लावून न दिल्याच्या रागातून पालिकेतील ह प्रभागातील एका सफाई कामगाराने ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय कुमावत यांच्याबरोबर कार्यालयात जोरदार वादावादी केली आहे. पालिका कार्यालयात एका सफाई कामगाराने धिंंगाणा घातल्याने साहाय्यक आयुक्त कुमावत यांनी याप्रकरणी अतिक्रमण नियंत्रण विभागाच्या उपायुक्तांंना यासंदर्भात अहवाल पाठविला असल्याचे समजते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिलीप उर्फ बुवा भंडारी असे या सफाई कामगाराचे नाव आहे. ते डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग कार्यालयात फेरीवाला हटाव पथकात कार्यरत आहेत. सर्व सफाई कामगारांंनी आपल्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी सफाईचे काम करावे, असे आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांचे आदेश आहेत. तरीही दिलीप भंडारी हे मात्र फेरीवाला हटाव पथकात कार्यरत असल्याने इतर कामगार तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा – कल्याण, डोंबिवलीत उमेदवारांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे राजकीय वाहन कोंडी, प्रवासी हैराण

घडलेली घटना

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक ग प्रभाग हद्दीतील फेरीवाल्यांंवर साहाय्यक आयुक्त कुमावत यांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. सफाई कामगार दिलीप भंडारी यांना डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ आपल्या नातेवाईकाच्या नावे आंबे विक्रीचा व्यवसाय करायचा होता. त्यांनी ग प्रभागात अर्ज दिला होता. रेल्वे स्थानकाजवळ त्यांनी परवानगीपूर्वीच आंबे विक्रीसाठी मंडप उभारला होता. रेल्वे स्थानक भागात एकही फेरीवाला दिसता कामा नये, असे कुमावत यांनी फेरीवाला हटाव पथकाला आदेश दिले आहेत. कुमावत यांच्या आदेशाप्रमाणे कामगारांनी अधीक्षक किशोर ठाकूर यांच्या उपस्थितीत भंडारी यांचा मंडप तोडून टाकला. त्याचा राग भंडारी यांना आला. ते ग प्रभाग कार्यालयात याप्रकरणी साहाय्यक आयुक्त संंजय कुमावत यांना जाब विचारण्यासाठी आले. आपला आंबे विक्रीचा मंच का तोडला, असा जाब कुमावत यांंना विचारून चढ्या आवाजात वाद घातला. रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त ठेवण्याचे आयुक्तांचे आदेश आहेत, त्याप्रमाणे कारवाई केली, असे उत्तर कुमावत यांंनी दिले.

आपण यासंदर्भात अर्ज दिला आहे. तरीही परवानगी का दिली जात नाही, असे प्रश्न भंडारी यांनी कुमावत यांना केले. भंडारी हेच ना फेरीवाला विभागात आंबे विक्रीचा व्यवसाय करून इतर फेरीवाल्यांना तेथे बसण्यास उद्युक्त करत असल्याने आणि त्यांची ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमाने चुकीची असल्याने कुमावत यांनी यासंदर्भात अतिक्रमण नियंत्रण उपायुक्तांंना अहवाल पाठविला असल्याचे समजते. ह प्रभाग हद्दीत डोंबिवली पश्चिमेतील अंतर्गत भागात रस्तोरस्ती, चौकांमध्ये टपऱ्या सुरू होण्यास भंडारी यांचा सहभाग असल्याच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. यामुळे पश्चिम भागाला बकालपण आले आहे.

हेही वाचा – ठाण्यापल्ल्याडील रेल्वे प्रवास धोक्याचा, मुंब्रा – कळवा दरम्यान दोन वर्षांत ३१ जणांचा रेल्वेतून खाली पडून मृत्यू

या घटनेसंदर्भात काही पत्र आले आहे का ते तपासतो. त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल. – अवधूत तावडे, उपायुक्त, अतिक्रमण नियंत्रण.

ग प्रभाग कार्यालयात घडलेल्या घटनेविषयी वरिष्ठांंना अहवाल पाठविला आहे, संजय कुमावत, साहाय्यक आयुक्त, ग प्रभाग, डोंबिवली.

आपण पालिकेतील कोणाही वरिष्ठ अधिकाऱ्याशी वाद घातला नाही किंवा अरेरावी केलेली नाही. असे काही घडलेच नाही, दिलीप भंडारी, सफाई कामगार, ह प्रभाग क्षेत्र, डोंबिवली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dombivli sweeper argument with the municipal assistant commissioner ssb