डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्याकडून शहर परिसर हरित करण्याची घोषणा केली जात असतानाच, दुसरीकडे ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ सार्वजनिक रस्त्यावरील एक झाड अनोळखी इसमांनी ज्वलनशील रसायनांचा वापर करून मारून टाकले आहे. या घृणास्पद प्रकाराबद्दल पर्यावरणप्रेमी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ ठाकुर्ली उड्डाण पुलाकडे येणाऱ्या एका सोसायटीच्या प्रवेशव्दाराच्या बाहेर सार्वजनिक रस्त्यावर अशोक जातीचे झाड आहे. सात ते आठ वर्षापूर्वीचे हे झाड हिरवेगार होते. या झाडालगत इतर अशोकाची झाडे आहेत. मागील दोन दिवसांपासून ठाकुर्ली रेल्वे स्थानक पूर्व भागातील एका सोसायटी लगतच्या अशोकाच्या उंच झाडाची पाने करपून गेली. झाडाचा बुंधा सुकून गेला. अचानक हे हिरवेगार झाड सुकल्याने या झाडाची निगा राखणाऱ्या पर्यावरणप्रेमींना संशय आला. या झाडावर अज्ञात व्यक्तिंनी रस्त्यात अडथळा नको म्हणून ज्वलनशील रसायनाचा वापर करून या झाडाला जिवंत जाळले असण्याची शक्यता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : नववर्षाची सुरुवात दूषित हवेतच; पहिल्या तीन दिवसात हवेचा दर्जा खालावलेलाच
ठाकुर्लीतील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पगारे यांनी या झाडावर ज्वलनशील प्रयोग करून त्याला मारून टाकणाऱ्या व्यक्तिंवर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र उद्यान विभागाचे सचिव संजय जाधव यांना दिले आहे. या रस्त्याच्या दुतर्फा अनेक वाहने उभी केली जातात. या झाडाचा वाहनांना किंवा परिसरातील सोसायट्यांना अडथळा येत असावा म्हणून या झाडाला मारले असावे, असा संशय पगारे यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे.
हेही वाचा : घोडबंदर भागात वृद्ध दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू, हत्येचा गुन्हा दाखल
उद्यान विभागाने या झाडाच्या परिसरात असलेले सीसीटीव्ही चित्रण तपासावे. म्हणजे या झाडावर विषप्रयोग करणारा अज्ञात इसम सापडण्याची शक्यता तक्रारदार पगारे यांनी व्यक्त केली आहे. ही तक्रार प्राप्त होताच उद्यान विभागाचे अधीक्षक संजय जाधव यांनी डोंबिवली विभागाचे अधीक्षक महेश देशपांडे यांना घटनास्थळाची पाहणी करून ताताडीने अहवाल पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. सकाळ, संध्याकाळ हिरव्यागार या झाडाला पाहणारे नागरिक, पर्यावरणप्रेमी अचानक हे झाड मारल्याने तीव्र संताप व्यक्त करत आहेत. या झाडाच्या परिसरातील इसमांनीच झाड मारल्याचा प्रयत्न केला आहे. इतर ठिकाणच्या लोकांना या झाडाविषयी राग असण्याचे कारण नाही, असे तक्रारदार पगारे यांनी सांगितले.
हेही वाचा : जितेंद्र आव्हाड यांना सांभाळून घ्या असे फोन मातोश्रीवरून यायचे, नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट
“ठाकुर्लीत एक जिवंत झाड मारल्याची एक तक्रार प्राप्त झाली आहे. याविषयी तातडीने पाहणी करून अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या अहवालानंतर योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येईल.” – संजय जाधव, मुख्य उद्यान अधीक्षक.
“उद्यान अधीक्षकांकडून ठाकुर्लीत झाड मारल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. आजच घटनास्थळी भेट देऊन अहवाल वरिष्ठांना देणार आहे. त्यानंतर ते अंतीम निर्णय घेतील.” – महेश देशपांडे, अधीक्षक, उद्यान, डोंबिवली.