डोंबिवली- डोंबिवली पूर्वेतील वाहन वर्दळीच्या टंडन रस्त्याने भरधाव वेगाने आणि मोटारीमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावून चाललेल्या एका मोटार कार चालकाला वाहतूक विभागाच्या पोलिसाने बुधवारी एस. के. पाटील शाळेजवळ अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र कार चालकाने हवालदाराकडे दुर्लक्ष करून मोटार वेगाने नेण्याचा प्रयत्न करताच, हवालदाराने बोनेटचा आधार घेत वायफरला घट्ट पकडले. तरीही चालकाने वेगाने मोटार चालवून वाहतूक हवालदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर चालकाला खाली पाडून पळून जाण्यात यशस्वी झाला.

वाहतूक पोलिसांनी या मोटारीचा वाहन क्रमांक मिळवून रात्रीच या वाहन चालकाचा शोध घेतला. तो २७ गावातील भोपर गावातील रहिवासी असल्याचे पोलिसांना समजले. रामनगर पोलीस ठाण्यात जखमी वाहतूक हवालदाराने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी रात्रीच त्याचा शोध घेतला. तो अल्पवयीन असल्याचे तपासात उघड झाले.

वाहतूक पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी मुसळधार पाऊस सुरू असताना टंडन रस्त्याने एक मोटार चालक वेगाने कोपर पुलाकडे येत होता. त्याने वाहनातील ध्वनीमुद्रकाचा आवाज मोठा ठेऊन परिसराला ऐकू जाईल अशा पध्दतीने गाणी लावली होती. हा प्रकार एस. के. पाटील चौकात तैनात डोंबिवली वाहतूक शाखेतील हवालदार बाळासाहेब होरे (४४), वाहतूक सेवक दिनकर सोमासे यांच्या निदर्शनास आला. हवालदार होरे यांनी वेगाने जात असलेल्या मोटार चालकाला थांबविण्यासाठी ते त्या वाहनाच्या पुढे जाऊन आडवे झाले. चालकाने त्यांना हुलकावणी देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. चालक पळून जात असल्याचे निदर्शनास येताच होरे यांनी बोनेटचा आधार घेऊन चालका समोरील काचा साफ करण्याच्या वायफरला घट्ट पकडून ठेवले. हवालदार आपल्यावर कारवाई करील या भीतीने चालकाने हवालदाराला रस्त्यावर पाडण्यासाठी आणि पळून जाण्यासाठी वेगाने ब्रेक मारत वाहन चिपळूणकर रस्त्याने शिवमंदिर रस्त्याकडे नेले.

पाहा व्हिडीओ –

हा थरार टंडन रस्ता ते चिपळणूकर रस्ता या मार्गावर सुरू होता –

वाहन चालविताना वायफरला लटकलेला हवालदार जमिनीवर पडेल या इराद्याने चालकाने मुद्दाम जोराने ब्रेक मारणे, एके ठिकाणी समोरून रिक्षा आली असताना त्या रिक्षेला धडक देण्याचा प्रयत्न करून हवालदार थोरे यांचा अपघात घडविण्याचा प्रयत्न केला. थोरे यांनी बोनेट आणि वायफर घट्ट पकडले असल्याने ते चालकाने किती प्रयत्न करूनही खाली पडत नव्हते. थोरे यांचे सहकारी वाहतूक सेवक दिनकर सोमासे या मोटारीच्या पाठीमागे धाऊन तिचा वाहन क्रमांक मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत होते. समोरून येणाऱ्या रिक्षा व अन्य वाहन चालकांना थोरे यांनी पकडून ठेवलेल्या वाहनाला थांबविण्यासाठी इशार करत होते. परंतु, आरोपी चालक उन्मादात असल्याने कोणालाही दात देत नव्हता. एके ठिकाणी मोटार चालकाने जोरात ब्रेक मारून आणि समोरीला रिक्षा चालकाला धडक देऊन हवालदार थोरे यांना रस्त्यावर पाडण्यात यशस्वी झाला. दहा मिनिटे हा थरार रामनगर भागातील टंडन रस्ता ते चिपळणूकर रस्ता मार्गावर सुरू होते. हा प्रकार पाहून पादचारी, इतर वाहन चालक हैराण झाले होते.

सीसीटीव्हीत मोटार कार चालकाचा थरार कैद –

चिपळूणकर रस्त्यावर हवालदार थोरे रस्त्यावर पडल्याचे दिसल्यावर मोटार चालक वेगाने मानपाडा रस्त्याने पळून गेला. मोटार चालकाच्या उन्नत्तपणाची चर्चा शहरात सुरू होती. चिपळूणकर रस्त्यावरील एका दुकानातील सीसीटीव्ही चित्रीकरणात मोटार कार चालकाचा थरार कैद झाला होता. वाहतूक पोलीस थोरे यांनी अज्ञात चालका विरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण आणि वाहन क्रमांकाच्या आधारे तपास करून रात्री दीड वाजता भोपर गावातून वाहतूक हवालदार थोरे यांच्या कामात अडथळा आणणाऱ्या, त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाला अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तो अल्पवयीन आहे. त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे, मोटार वाहन कायद्याचा भंग करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोपर गावातील एका धनदांडग्याचा तो मुलगा असल्याचे समजते.

अधिक माहितीसाठी डोंबिवली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांना सतत संपर्क केला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. वाहतूक शाखेतील इतर कर्मचाऱ्यांनी मात्र असा प्रकार घडल्याचे सांगितले. रामनगर पोलिसांनी सांगितले, हवालदार थोरे यांना फरफटत नेणारा आरोपी अल्पवयीन आहे. बाल हक्क कायद्यानुसार त्याला अटक करता येत नाही. परंतु, त्याच्यावर कायद्याने आवश्यक कारवाई केली जाणार आहे.