डोंबिवली : डोंबिवली जवळील खोणी पलावा भागात शनिवारी रात्री एका टेम्पो चालकाने विरंगुळा म्हणून सोबतच्या क्लिनरचा टेम्पो चालविण्यास दिला. या टेम्पो चालकाला वाहन चालिवण्याचा पुरेसा अनुभव नसल्याने त्याने बेदरकारपणे, निष्काळजीपणे टेम्पो चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या झोमॅटो कंपनीच्या एका वस्तू वितरक तरूणाला जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या बेशिस्त टेम्पो चालकाने वस्तू वितरकाला धडक दिल्यानंतर रस्त्या लगतच्या आठ दुचाकींना धडक देऊन त्या उलटया सुलट्या केल्या. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. या धडकेनंतर टेम्पो पडलेल्या वाहनांना अडकला म्हणून पुढील जीवित हानी टळली. मागील काही दिवसांपासून कल्याण, ठाणे, डोंबिवली परिसरात निष्काळजीपणे वाहन चालवून निष्पाप प्रवासी, दुचाकी स्वार, पादचाऱ्यांचा बळी घेणाऱ्या वाहन चालकांचे प्रमाण वाढले आहे. या बेशिस्त वाहन चालकां विरुध्द उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस कधी आक्रमक होणार असे संतप्त प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

हेही वाचा : मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनरच्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू

सौरभ यादव असे मयत वस्तू वितरकाचे नाव आहे. मानपाडा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जमावाने टेम्पो चालकासह बेशिस्त टेम्पोल चालकाला पकडून ठेवले. क्लिनर आतीश जाधव याला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस घटनास्थळी वेळीच पोहचले नसते तर चालक आणि क्लिनरला पोलिसांनी चांगलाच प्रसाद दिला असता. नागरिकांंनी टेम्पो मालक, चालक आणि बेदरकार क्लिनर विरूध्द कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत अशा बेशिस्त वाहन चालकांवर कठोर कारवाई होत नाही. तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत, असे नागरिकांनी सांगितले. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी आता प्रशासकीय कामे बाजुला ठेऊन रस्त्यावर उतरण्याची मागणी नागरिक करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dombivli the death of a delivery boy in tempo accident css