डोंबिवली : आई-वडील गावी गेले आहेत, या संधीचा गैरफायदा घेत डोंबिवली पश्चिमेतील चिंचोड्याचा पाडा भागात राहत असलेल्या एका बेरोजगार असलेल्या २९ वर्षाच्या मुलाने घेऊन आपल्या वृध्द आई-वडिलांनी जपून ठेवलेल्या दोन लाख ८५ हजार रूपयांच्या रकमेची चोरी केली आहे. मुलानेच आई, वडिलांच्या पैशाची चोरी केल्याने पोलीसही हा चोरीचा प्रकार पाहून हैराण आहेत. विनायक प्रभाकर माने (२९, रा. गंध पद्मिनी सोसायटी, चिंचोड्याचा पाडा, सुभाष रस्ता, डोंबिवली) असे आरोपी मुलाचे नाव आहे. चंद्रकला प्रभाकर माने (६०) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्या आरोपी विनायक याच्या आई आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी सांगितले, विनायकची आई चंद्रकला या गृहसेविका आहेत. परिसरात घरकाम करून मिळणाऱ्या उपजीविकेतून त्या घरगाडा चालवितात. त्यांचे पती सिंंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे राहतात. त्यांची तब्येत ठीक नसल्याने तेथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पतीच्या तब्यतेची खुशाली घेण्यासाठी तक्रारदार चंद्रकला माने मे महिन्यात कणकवली येथे गेल्या होत्या. तेथून डोंबिवलीत परत आल्यावर चंद्रकला यांनी घरातील लोखंडी कपाटाच्या तिजोरीतील रक्कम तपासली. त्यात त्यांना काही आढळले नाही. त्यांनी मुलाला तिजोरीतील ३५ हजार रूपये कुठे गेले, अशी विचारणा केली. त्याने आपणास काही माहिती नसल्याची उत्तरे दिली. घरात चोरी झाली नसताना पैसे गेले कोठे, असा प्रश्न चंद्रकला यांना पडला.

हेही वाचा : ‘एमएमआरडीए’ने बांधकाम परवानग्या मराठीत द्याव्यात, आमदार प्रमोद पाटील यांची मागणी

तक्रारदार यांना संशय आल्याने त्यांनी पतीचे तिजोरीत असलेले पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम कार्ड तपासले. तेही जागेवर नव्हते. चंद्रकला यांनी बँकेत जाऊन पतीच्या बँक बचत खात्यात किती पैसे शिल्लक आहेत याची विचारणा अधिकाऱ्यांकडे केली. तेव्हा त्यांना १६ जून ते २१ जून या कालावधीत या बँक खात्यामधून एटीएमच्या साहाय्याने डेबिट कार्ड माध्यमातून वेगळ्या व्यवहारांमधून एकूण दोन लाख ५० हजार रूपये काढले असल्याचे सांगण्यात आले. हे ऐकून चंद्रकला हादरल्या.

हेही वाचा : डोंबिवलीतील हाय प्रोफाईल गृहसंकुल प्रकल्पात पाण्याचा खडखडाट, घरं खरेदी केलेल्या लोकांची निराशा

आपल्या मुलाशिवाय हे व्यवहार दुसरे कोणी करू शकत नाही याची खात्री आईला पटली. त्यामुळे घरातील तिजोरीतील ३५ हजार रूपये आणि बँकेतील दोन लाख ५० हजार रूपये मुलगा विनायक यानेच लबाडी करून चोरी केले असल्याचे लक्षात आल्यावर आणि मुलगा याविषयी काहीही खरे बोलण्यास तयार नाही. त्यामुळे आई चंद्रकला माने यांनी मुलगा विनायक याच्या विरुध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dombivli theft of rupees 2 lakh 85 thousand by son in his parent s house css
Show comments