डोंबिवली : येथील पूर्व भागात नांदिवली टेकडी भागातील बामणदेव मंदिर भागात एका डाॅक्टरच्या घरात दोन चोर शिरले. त्यांनी घरातील एका आठ वर्षाच्या मुलीच्या तोंडात बोळे कोंबून तिला धमकावून घरातील कपाटातील सोन्याचे दागिने, ४० हजार रूपयांची रोख रक्कम असा एकूण दोन लाखांचा ऐवज चोरून नेला. रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला आहे.
नांदिवली टेकडी भागात राहणारे डाॅ. सदानंद सिंह यांच्या घरात हा प्रकार घडला आहे. या चोरी प्रकरणी डाॅ. सिंह यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले, डाॅ. सदानंद सिंह रविवारी संध्याकाळी सहा वाजता घराबाहेर पडले होते. त्यांच्या घरात त्यांची जिवा ही आठ वर्षाची मुलगी होती. दरवाजा उघडा असल्याने दोन अनोळखी इसम डाॅ. सिंह यांच्या घरात घुसले. त्यांनी घरात लहान मुली व्यतिरिक्त कोणी नाही याचा अंदाज घेतला.
हेही वाचा : चविष्ट जेवणासाठी मुलाचं राक्षसी कृत्य; विळ्याने वार करत जन्मदात्या आईचा घेतला जीव
मुलीने ओरडा करू नये म्हणून मुलगी जिवा हिला धाकदपटशा दाखवून तिच्या तोंडात चोरट्यांनी कापडाचे बोळे कोंबले. तिला एका जागी बसवून ठेऊन चोरट्यांनी घरातील कपाटातील ४० हजार रूपयांची रोख आणि दीड लाखाहून अधिक रकमेचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला. डाॅ. सिंह एक तासाने घरी परतले तेव्हा हा चोरीचा प्रकार उघडकीला आला.