डोंबिवली पूर्वेतील आयरे रस्ता भागातील पोलीस चौकीजवळ शनिवारी मध्यरात्री चार दुकानांमध्ये चोरी झाली. दुकानदारांंनी यासंदर्भात तक्रार करताच रामनगर पोलिसांनी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने चोरटा शोधून काढला. या चोरट्याची ओळख पटवून पोलिसांनी दुकानदाराच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. हा चोरटा आयरे गाव भागातील क्रांतीनगर झोपडपट्टीतील रहिवासी आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महेंद्र चव्हाण यांचे आयरे गावात पोलीस चौकीच्या बाजुला पोळीभाजीचे दुकान आहे. शनिवारी रात्री अकरा वाजता ते दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने चव्हाण यांच्या दुकानाचे लोखंडी शटर धारदार कटावणीने उघडले. दुकानात प्रवेश दुकानातील ग्राहक सेवेतून मिळालेली साडे नऊ हजाराची रक्कम चोरली. या चोरीनंतर चोरट्याने पोळी भाजी केंद्रालगत असलेल्या गाळ्यांमधील पिशव्या दुरुस्ती, पाणी पुरी विक्रेता, पान टपरी यांची दुकाने फोडून दुकानातील रोख रक्कम चोरून नेली.

पान टपरी मालक सकाळी दुकानात आला. त्यावेळी त्यांना आपल्या दुकानासह पोळी भाजी केंद्रात चोरी झाल्याचे समजले. त्यांनी आणखी चौकशी केली त्यावेळी एका रांगेतील अन्य दोन दुकानांमध्ये चोरी झाल्याचे समजले. चोरट्याने एका रात्रीत आयरेगाव भागातील चार दुकानांमध्ये चोरी करून या दुकानांमधील रक्कम चोरून नेली होती.

महेंद्र चव्हाण शेजारील दुकानदारांसह रविवारी सकाळी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतल्यानंतर पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यामध्ये आयरेगाव पोलीस चौकीजवळील महेंद्र चव्हाण यांच्या पोळीभाजी केंद्राचे शटर एक इसम उघडत असल्याचे दिसले. या इसमाची पोलिसांनी ओळख पटवली. त्यावेळी तो इसम प्रथमेश गणेश पाटील असल्याचे पोलिसांना समजले. प्रथमेश हे आयरेगाव पोलीस चौकीच्या मागील बाजुला क्रांतीनगर झोपडपट्टीत राहतात. प्रथमेश यांंनीच चारही दुकानांमध्ये चोरी केली असल्याने पोलिसांनी त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Story img Loader