डोंबिवली : डोंबिवलीतील गणपती बाप्पांचे विसर्जन माणकोली उड्डाण पुलाजवळील मोठागाव रेती मंदिर खाडी किनारी होणार आहे. या विसर्जन कालावधीत डोंबिवली पश्चिम येथील रस्त्यांवर वाहन कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक विभागाने गणपती विसर्जन मिरवणुकांच्या दिवशी माणकोली उड्डाणपूल दुपारी १२ ते रात्री गणपती विसर्जन होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी या संदर्भाची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. माणकोली पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याने चालकांनी पर्यायी रस्त्याचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. दीड दिवस, अडीच दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि अनंत चतुर्थी या दिवशी सार्वजनिक आणि खाजगी गणपती बाप्पांचे विसर्जन होणार असल्याने. या कालावधीत दुपारी १२ ते गणपती विसर्जन होईपर्यंत माणकोली पूल वाहतुकीसाठी बंद असणार आहे.
हेही वाचा : ठाणे: गणेशोत्सवात दिवसा अवजड वाहनांना निर्बंध
मुंबई, ठाणे परिसरातून माणकोली पूल मार्गे डोंबिवली करणे येणाऱ्या वाहनांना अंजुर दिवेगाव, लोढा धाम, माणकोली गाव येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने अंजुरफाटा, रांजनोली, भिवंडी वळण रस्ता मार्गे इच्छित स्थळी जातील. शिळफाटा रस्ता, पत्रीपूल येथून पुरली ९० फुटी रस्ता, सोनारपाडा डीएनएस बँक, घरडा सर्कल, मानपाडा रस्ता, सुयोग हॉटेल, टाटा नाका, कोपर आणि ठाकुर्ली उड्डाणपूल या रस्ते मार्गाने माणकोली पुलाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रस्तावित ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही सर्व वाहने पत्री पूल, गोविंद वाडी रस्ता, दुर्गाडी किल्ला मार्गे इच्छित स्थळी जातील.
हेही वाचा : ठाणे: अवजड वाहनांच्या नियमावलीचे काटेकोर पालन करा, महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश
डोंबिवली शहरातून कोपर, ठाकुर्ली उड्डाणपूल मार्गे माणकोली पुलाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कोपर आणि ठाकुरली पूल येथे रस्ता बंद करण्यात येणार आहे. या वाहन चालकांनी पत्री पूल दुर्गाडी किल्ला मार्गे इच्छित स्थळी जायचे आहे. डोंबिवली पश्चिम येथून रेल्वे फाटक मार्गे माणकोली पुलावर जाणाऱ्या वाहनांना माणकोली पूल येथे रस्ता बंद करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या रस्त्यावरून प्रवेश असेल, असे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे. माणकोली पुलावरून वाहतूक बंद केल्याने पर्यायी रस्ते मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहन कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यायी रस्त्यांवर वाहतूक विभागाने अधिकचा बंदोबस्त ठेवण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.