डोंबिवली: डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्थानका जवळील नेहरू रस्त्यावरील छत्रपती शिवाजी उद्यानात बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान एक महिला चक्कर होऊन रस्त्यावर पडली. बेशुध्दावस्थेत गेल्याने या महिलेला मदत करतो दाखवून एका भामट्याने या महिलेच्या हातामधील एक लाख ८० हजार रूपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या.
रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार करण्यात आली आहे. धरा प्रतीक सावला (२८) असे महिलेचे नाव आहे. त्या वल्लभभाई पटेल रस्ता सारस्वत काॅलनी भागात राहतात. पोलिसांंनी सांंगितले, तक्रारदार धरा प्रतीक सावला या बुधवारी रात्री आठ वाजणेच्या दरम्यान डोंंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी उद्यानात फिरण्यासाठी आल्या होत्या. अलीकडे उकाड्याचे दिवस आहेत. दिवसभर घामाच्या धारांनी अस्वस्थ नागरिक संध्याकाळच्या वेळेत शहरातील उद्याने, बगिचांमध्ये फिरण्यासाठी येतात. त्याप्रमाणे तक्रारदार धरा सावला या छत्रपती उद्यानात बुधवारी फिरण्यासाठी आल्या होत्या.
उद्यानात फिरत असताना अचानक त्यांना चक्कर आली. त्या उद्यानातील मोकळ्या जागेत पडल्या. त्या बेशुध्दावस्थेत गेल्या. या कालावधीत धरा यांंना मदत करण्याच्या बहाण्याने एका भुरट्याने त्यांच्या हातामधील सोन्याच्या एक लाख ८८० हजार रूपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरून पलायन केले. इतर नागरिकांंनी धरा सावला यांना पाणी देऊन शुध्दीवर आणले. त्यांना प्रथमोपचारासाठी साहाय्य केेले. शुध्दीवर आल्यानंतर धरा सावला यांना आपल्या हातात सोन्याच्या बांगड्या नसल्याचे दिसले. त्यांनी उद्यानात शोध घेतला, पण त्यांना बांगड्या आढळून आल्या नाहीत. भुरट्या चोरानेच त्या चोरून नेल्या असाव्यात, असा संशय व्यक्त करून धरा यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक पी. के. नरळे तपास करत आहेत.