डोंबिवली : अलीकडे गुन्ह्यांमध्ये लहान मुलांचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. हे चिंताजनक आहे. अशाप्रकारच्या अपप्रवृत्ती रोखण्यासाठी नागरिकांनी सजग राहाणे आवश्यक आहे. याशिवाय दत्तक केंद्रातून मुले दाम्प्त्यांना दत्तक देताना या सगळ्या प्रकारामुळे विशेष काळजी घेतली जात आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ॲड. पल्लवी जाधव यांनी येथे एका कार्यक्रमात दिली.

डोंबिवली महिला महासंघातर्फे महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या संरक्षण अधिकारी रेखा हिरे, बाल संरक्षण अधिकारी ॲड. पल्लवी जाधव यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी महासंघाच्या अध्यक्ष सनदी लेखापाल जयश्री कर्वे, उपाध्यक्ष नेत्रा फडके, कोषाध्यक्ष सुनीती रायकर, महासंघ अध्यक्षा डाॅ. विंदा भुस्कुटे, ज्येष्ठ पत्रकार सई बने आणि इतर मान्यवर उपस्थित होत्या.

अलीकडच्या काळात गुन्ह्यांमध्ये लहान मुलांचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. लहान मुलांवर झटकन संशय घेतला जात नाही. त्यामुळे चोरी किंवा अन्य गुन्ह्यांसाठी लहान मुलांचा वापर करण्याकडे समाजकंटकांचा कल वाढत आहे. काही दाम्पत्य आम्हाला मुल होत नाही. आम्हाला मुल दत्तक घ्यायचे आहे असे सांगून दत्तक केंद्रात येतात. आणि मुल दत्तक घेतात. त्या मुलाचा नंतर गुन्हे करण्यासाठी वापर केला जातो. त्यामुळे दत्तक प्रक्रिया केंद्रातून मुल दत्तक देताना विशेष काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शासकीय प्रक्रियेतून मुल दत्तक देताना त्या कुटुंबाची पार्श्वभूमी, मुल दत्तक घेतल्यानंतर दर दोन वर्षांनी त्या मुलाचा योग्यरितीने सांभाळ होतो की नाही याची माहिती घेतली जाते, असे ॲड. पल्लवी जाधव यांनी सांगितले. बेघर, अनाथ, पीडित मुलांच्या सुविधांसाठी शासनाच्या जेवढ्या योजना त्या योजनेतून त्या मुलांचा सांभाळ केला जातो, असे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातही बालविवाहांचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४२ बालविवाह रोखण्यात यश आले आहे. मुलांच्या वागण्यात काही बदल जाणवत असतील तर पालकांनी वेळीच जागृत होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात २५ बालगृह आहेत. दोन दत्तक संस्था, दोन निरीक्षण गृह आहेत, असे ॲड. जाधव यांनी सांगितले. शासनातर्फे प्रत्येक जिल्ह्यात महिला व बाल विभागाची स्थापन करण्यात आली आहे. बालके किंवा महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर या विभागाकडून पीडितांना योग्य ते शासकीय सहकार्य केले जाते, असे महिला व बाल संरक्षण अधिकारी रेखा हिरे यांनी सांगितले.

स्वरुपीनी भगिनी मंडळाच्या महिला सदस्यांनी ज्येष्ठ पत्रकार सई बने लिखित पीडित महिलेवरील अत्याचार विषयावरील पथनाट्य सादर केले. अहिल्याबाईंच्या जीवनावरील एकपात्री जीवनपट आरती मुनीश्वर यांनी सादर केला. प्राचार्या सुप्रिया नायकर यांनी सूत्रसंचालन केले.