डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत सुभाषचंद्र बोस रस्त्यावर नवापाडा, कुंभारखाणपाडा, हनुमान मंदिर, अश्वमेध सोसायटी भागात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या निधीतून सिमेंट काँक्रीटची कामे सुरू आहेत. ही कामे कल्याण डोंबिवली पालिकेच्या प्रस्तावित रस्ते विकास आराखड्याप्रमाणे होणे आवश्यक आहे. परंतु, विकास आराखड्यातील रस्त्याची सीमारेषा न पाळता या भागात मनमानी पध्दतीने, काही धनदांडग्याचा दबावाला बळी पडून गटारे, रस्तारुंदीकरण आणि काँक्रिट रस्त्याची कामे सुरू असल्याने या भागातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

एमएमआरडीएने काँक्रीट रस्ते काम सुरू करण्यापूर्वी पालिका प्रशासन प्राधिकरणाला पालिकेच्या विकास आराखड्यातील रस्त्याप्रमाणे रस्त्याला अडथळा ठरणारी अतिक्रमणे तोडून देते. त्यानंतर एमएमआरडीएचे ठेकेदार तेथे रस्ता रूंदीकरण, गटार बांधणी आणि काँक्रीटचे काम करतात. सुभाषचंद्र बोस रस्त्यावर कुंभारखाणपाडा, नवापाडा भागात विकास आराखड्यातील रस्त्याचे काम १८ मीटर रुंदीचे होणे आवश्यक आहे. काही स्थानिक धनदांडग्यांनी आपल्या अतिक्रमित बांधकामाला धक्का लागणार नाही म्हणून पालिकेला अतिक्रमणे तोडण्यास विरोध केला आहे.

रस्ते बाधित टपरी, गाळाधारक असेल तर पालिका तात्काळ त्याच्यावर कारवाई करते, मग धनदांडग्यांचा बांधकामांवर रस्त्यासाठी पालिका कारवाई का करत नाही. सिमेंट काँक्रीटचा रस्ता एकदाच होणार आहे. या रस्त्यावर भविष्यात वाहतूक कोंडी होईल. त्याचे चटके स्थानिक रहिवाशांना बसतील, अशा तक्रारी स्थानिकांनी केल्या.

सुभाषचंद्र बोस रस्त्यावरील अश्वमेध सोसायटी ते भेंडीचे झाड भागात विकास आराखड्यात रस्ता २४ मीटर आहे. या भागात आवाज उठविण्यासाठी कोणीही नसल्याने त्यांना पालिकेने नोटिसा काढल्या आहेत. हेमंत जनरल स्टोअर्स, हनुमान मंदिर चौक, कुंभारखाण पाडा रस्ता अठरा मीटर आहे. अशाप्रकारने जेथे धनदांगडे विरोध करतात तेथे सोयीप्रमाणे आणि जेथे आवाज उठवायला कोणी नाही तेथे नोटिसा असा प्रकार सुभाषचंद्र बोस रस्त्यावर सुरू आहे, अशा तक्रारी स्थानिकांनी केल्या.

काही ठिकाणी सुभाषचंद्र रस्ता २४ मीटर, काही ठिकाणी १८ आणि त्याहून कमी असा असमान पध्दतीने सुभाषचंद्र बोस रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या असमान पध्दतीचा भविष्यात वाहतुकीला अडथळा निर्माण होणार आहे, असे स्थानिकांनी सांगितले.

सुभाषचंद्र बोस रस्त्याचे रेल्वे स्थानक ते कुंभारखाणपाड रस्त्याचे १८ मीटरप्रमाणे रुंदीकरण केले तर अनेक इमारती बाधित होत आहेत. काही बांधकामे आरसीसी पध्दतीची आहेत. बाधितांचा नवीन प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे या रस्त्याचे आवश्यक तेथे रुंदीकरण आणि काही ठिकाणी आहे त्या जागेतून रस्ता असे नियोजन केले आहे. – राजेश सावंत, साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग.

Story img Loader