डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात पालिकेचे सुसज्ज वाहनतळ नाही. रेल्वे स्थानकालगतचे डोंबिवली पूर्व बाजीप्रभू चौकातील वाहनतळ मागील सहा ते सात वर्षापासून पालिकेकडून चालविले जात नाही. रेल्वे स्थानक भागात वाहने उभी करण्यास जागा नसल्याने नागरिक रेल्वे स्थानक भागातील सोसायट्या, दुकाने, हाॅटेल्स समोर दुचाकी वाहने उभी करून कामावर निघून जातात.
ही दुचाकी वाहने दररोज सोसायटी, हाॅटेल, इतर आस्थापना, दुकानांच्या मुख्य प्रवेशव्दारात उभी केली जात आहेत. सोसायट्यांमधील रहिवाशांना आपली दुचाकी, चारचाकी वाहने सोसायटी बाहेर काढणे मुश्किल होते. शिळफाटा, २७ गाव, पलावा, एमआयडीसी, नेवाळी परिसरातील नोकरदार सकाळच्या वेळेत आपली वाहने डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील रस्ते, गल्ली बोळांमध्ये उभी करतात आणि कामाला निघून जातात. या वाहनांवर वाहतूक पोलीस, पालिकेकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे वाहन चालक मनमानीने रस्त्यावर वाहने उभी करत आहेत.
हेही वाचा : उल्हासनगरच्या शासकीय निरीक्षणगृहातील आठ अल्पवयीन मुली पळाल्या
सर्वाधिक वाहने आगरकर रस्ता, फडके छेद रस्ते, मानपाडा आणि शिवमंदिर छेद रस्त्यावरील टाटा लाईन खालील मोकळी जागा याठिकाणी उभी केली जातात. टाटा लाईनखाली सुसज्ज वाहनतळ उभे करण्याचे नियोजन माजी महापौर दिवंगत राजेंद्र देवळेकर यांनी केले होते. मागील दहा वर्षात हे नियोजन पालिकेकडून अंमलात आणले नाही. सुमारे ७०० मीटरची टाटा लाईनखालील रिकाम्या जागेत पालिका वाहनतळ सुरू करू शकते. दैनंदिन महसूल याठिकाणी पालिकेला मिळेल. रेल्वे स्थानकाजवळील पी. पी. चेंबर्स माॅलमधील वाहनतळ वाहनांनी खच्च भरलेले असते.
गाढवाचा फलक
टाटा लाईनखाली दररोज सहाशे ते सातशे दुचाकी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केल्या जातात. या दुचाकी अनेक वेळा या भागातील सोसायट्यांच्या प्रवेशव्दारासमोर उभ्या केल्या जातात. ही वाहने दररोज प्रवेशव्दारावरून हटवून मग रहिवाशांना येजा करावी लागते. टाटा लाईन खालील काही सोसायट्यांंनी हा नेहमीचा त्रास टाळण्यासाठी ‘ टाटा लाईन स्वच्छ ठेऊ या. सोसायटीच्या गेटसमोर वाहने उभी करू नका. सोसायट्याच्या प्रवेशव्दारासमोर वाहन उभे केल्यास त्या वाहनाच्या चाकामधील हवा काढून घेतली जाईल,’ असे सूचना फलक लिहिले आहेत. एवढे सांगुनही जे वाहन चालक सोसायटीच्या प्रवेशव्दारासमोर वाहने उभी करतात त्यांच्यासाठी ‘मी मोठा गाढव आहे. म्हणुन मी गेट समोर गाडी लावतो,’ असा उपरोधिक फलकही काही सोसायट्यांच्या प्रवेशव्दारावर झळकल्याचे दिसते.
हेही वाचा : कल्याण – डोंबिवलीत चोरीचा एक कोटी ४३ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना परत
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील पाटकर प्लाझामधील वाहनतळ सुरू करण्याचा प्रशासन विचार करत आहे. लवकरच वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन पूर्व भागात वाहनतळ सुरू केले जाईल.
प्रसाद ठाकुर (साहाय्यक आयुक्त)