डोंबिवली : येथील एमआयडीसीतील विको नाका भागातील एका खासगी आस्थापनेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या महिलेचा इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून पडून मंगळवारी मृत्यू झाला. ही महिला पिसवली भागात आपल्या कुटुंबीयांसमवेत राहत होती. गुडीयादेवी मनीष कुमार असे मयत महिलेचे नाव आहे. ही महिला विको नाक्यावरील ग्लोब स्टेट इमारतीमधील एका खासगी कार्यालयात सफाईचे काम करत होती.
हेही वाचा : शिवसेना शहप्रमुखाकडून आमदाराला कुंभकर्णाची उपमा; पाणी, वीज समस्येवरून विद्यमान आमदारांना अप्रत्यक्ष टोला
ही महिला आणि तिचा सहकारी बंटी सफाईचे काम सुरू करण्यापूर्वी इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरील जिन्या जवळच्या कठड्यावर बसले होते. त्यांच्यामध्ये गप्पागोष्टी आणि ते एकमेकांंची चेष्टा मस्करी करत होते. गुडीयादेवी सोबत बंटी हा कामगारही येथे काम करत होता. दोघे एकमेकांची चेष्टा करत असताना चेष्टेमध्ये गुडीयादेवीसह बंटीचा कठड्यावरून तोल गेला. ते इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून तळ मजल्याला पडले. गुडीयादेवीला जोराचा धक्का आणि मार लागल्याने ती जागीच मरण पावली. बंटी जिन्यांच्या आधाराने अडखळत जमिनीवर पडल्याने तो थोडक्यात बचावला. त्यालाही दुखापत झाली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा घातपात आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत. गुडीयादेवीला दोन लहान मुले आहेत.