डोंबिवली : प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीने आपल्या मित्र आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने अतिशय क्रूरपणे गेल्या आठवड्यात हत्या केली. त्याचा मृतदेह आडिवली गावातील एका विहिरत अवजड दगड बांधून फेकून दिला. मृतदेहाची ओळख पटताच ही हत्या मयताच्या पत्नीने आपल्या मित्राच्या मदतीने केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विहिरीत आढळलेला मृतदेह चंद्रप्रकाश लोवंशी यांचा होता. चंद्रप्रकाश यांच्या पत्नीने गेल्या आठवड्यात पती चंद्रप्रकाश बेपत्ता असल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात केली होती. चंद्रप्रकाशचा मारेकरी सुमित राजेश विश्वकर्मा, रिता चंद्रप्रकाश लोवंशी यांना पोलिसांनी अटक केली आहे. रिता आणि सुमित यांचे लहानपणापासून प्रेमसंबंध होते. या प्रेमात चंद्रप्रकाशचा अडथळा येत होता. त्यामुळे त्याला मारण्याचा कट मागील चार महिन्यांपासून रिता आणि सुमित करत होते, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : कल्याण मधील आरटीओ कार्यालयाचे कामकाज ठप्प, कर्मचारी मराठा नोंदी सर्वेक्षणाच्या कर्तव्यावर

आडिवली येथील विद्याधर वझे यांना आपल्या विहिरीत मृतदेह असल्याचे आढळले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी हा मृतदेह चंद्रप्रकाश याचा असल्याची खात्री केली. पोलिसांनी चंद्रप्रकाशची पत्नी रिता हिची सखोल चौकशी केली. ती उडवाउडवीची उत्तरे देत होती. पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली. तिने आपण आपला प्रियकर सुमित याच्या सहकार्याने आणि इतर दोन अल्पवयीन मुलांच्या साहाय्याने ही हत्या केल्याची कबुली दिली. चंद्रप्रकाशला निर्जन स्थळी मोटारीतून नेऊन तेथे त्याची गळा दाबून हत्या करण्यात आली. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. त्याचा मृतदेह कोणाला दिसू नये म्हणून त्याला ८० किलो वजनाचा अवजड दगड बांधून तो मृतदेह वझे यांच्या विहिरीत फेकून देण्यात आला, असे विश्वकर्माने पोलिसांना सांगितले. अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रेमासाठी पतीची एवढ क्रूरपणे हत्या करणाऱ्या पत्नी विषयी परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लोवंशी कुटुंब दावडी परिसरात राहत होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dombivli woman killed husband with lover s help css