डोंबिवली पश्चिमेत भावे सभागृहाजवळ सदगुरू कृपा या बेकायदा इमारतीत राहणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्ता असलेल्या महिलेला घराबाहेर काढण्याचा डाव या इमारतीची उभारणी करणाऱ्या भूमाफियांनी रचला आहे. या महिलेने घर सोडून निघून जावे म्हणून या महिलेची भूमाफिया आणि एक लोकप्रतिनिधी छळवणूक करत आहे. या सततच्या छळाला कंटाळून या महिलेने मंगळवार सकाळपासून भावे सभागृहा जवळील महात्मा गांधी उद्याना जवळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
हेही वाचा… ठाणे: काल्हेरमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प
हेही वाचा… डोंबिवलीत बेकायदा इमारतींचा पाणीपुरवठा खंडित; पाण्याची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
अनिता ठक्कर असे या महिलेचे नाव आहे. त्या सदगुरू कृपा या बेकायदा इमारतीत राहतात. सद्गुरू कृपा इमारतीची उभारणी झाल्यानंतर भूमाफिया बाळू भोईर आणि इतर भागीदारांनी या इमारती मधील सदनिका अनिता ठक्कर हिच्या मदतीने २५ ते ३० लाख रुपयांना विकल्या. या खरेदीचे नोटरी पध्दतीने कागदपत्र तयार करण्यात आले. तसेच तिलाही घर देण्यात आले होते. परंतु दोन वर्ष उलटल्यानंतर सद्गुरू इमारती मधील रहिवासी अनिता ठक्कर यांना भूमाफियांनी घर सोडण्यासाठी त्यांची छळवणूक सुरू केली. त्या राहत असलेल्या इमारतीचे वीज देयक, पाणी देयक माफियांनी आपल्या मुलाच्या नावे केले. सदनिकाही अनित ठक्कर यांच्या ताब्यातून काढून घेऊन ती सदनिका बळकावण्याचा कट माफियांनी रचला आहे. हे सर्व माफिया सध्या उजळ माथ्याने शहरात फिरत आहेत. एका लोकप्रतिनिधी पडद्यामागून या सर्व हालचाली करत असल्याचे सांगण्यात येते.