डोंबिवली: डोंबिवली शिक्षण मंडळ प्रसारक मंडळ संचालित के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाने महाविद्यालय नियंत्रित (ओएस १६) या भूखंंडावर भव्य क्रिकेट अकॅडेमी सुरू केली आहे. या क्रिकेट अकॅडेमीला यापूर्वी महाविद्यालयाच्या सेवेत असलेले प्राध्यापक, माजी खासदार दिवंगत कापसे यांचे नाव देण्यात आले आहे.क्रिकेटविषयक सर्व सुविधांनीयुक्त दिवंगत प्रा. राम कापसे अकॅडेमीचे उद्घाटन निवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या कार्यक्रम डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई, मंडळाचे सभासद डाॅ. प्रसाद कामत, मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल लवांगरे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, क्रीडा विषयक शिक्षक उपस्थित होते.

डोंबिवलीतील मुला, मुलींमध्ये विविध प्रकारचे क्रीडा कौशल्य आहे. स्थानिक, राष्ट्रीय स्तरावर या मुलांनी चमकदार कामगिरी केली आहे. अशा मुलांना आपल्या गावातच दर्जेदार क्रीडा विषयक प्रशिक्षण, मार्गदर्शन मिळावे म्हणून के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाने विविध प्रकारची क्रीडांंगणे विकसित करून या मुलांचे क्रीडा विश्व विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच बरोबर आता दिवंगत प्रा. राम कापसे क्रिकेट अकॅडेमी सुरू करून क्रिकेटमध्ये आपला जीवन प्रवास करून इच्छिणाऱ्या खेळाडुंना पेंढरकर महाविद्यालयाने क्रिकेट अकॅडेमी सुरू करून क्रिडा जगतामधले नवीन पाऊल टाकले आहे. नियमित अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांचे क्रीडागुण विकसित करण्यासाठी सुरू असलेला पेंढरकर महाविद्यालयाचा प्रवास नक्कीच कौतुकास्पद आहे, असे मत भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी निवृत्ती सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.मागील दीड वर्षाच्या कालावधीत के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसह क्रीडाविषयक आवड असलेल्या नागरिकांचा विचार करून डोंबिवली आणि परिसरातील नागरिकांसाठी दिवंगत डाॅ. यु. प्रभाकर राव स्पोर्टस अकॅडेमी, दिवंगत माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी युवा मल्टी स्पोर्ट्स ही भव्य क्रीडांगणे विकसित केली आहेत. आता नव्याने राम कापसे क्रिकेट अकॅडेमी सुरू करण्यात आली आहे. क्रीडापटू, क्रीडाप्रेमी नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांनी यावेळी केले.

डोंबिवली परिसरातील क्रीडापटू, खेळाडु, क्रीडाप्रेमी नागरिक यांच्यासाठीही अत्याधुनिक सर्व क्रीडाविषयक सुविधांनी युक्त मैदाने बारही महिने वाजवी दरात उपलब्ध असतील, असे देसाई यांनी सांगितले.