अंबरनाथ : अधिकचे पैसे घेऊन कमी खाद्यपदार्थ देण्याबाबत जाब विचारणाऱ्या रेल्वे प्रवाशाला गितांजली एक्सप्रेसमधील उपहारगृहाच्या कर्मचाऱ्यांनी उपहारगृहाच्या डब्ब्यात मारहाण करत डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हावडा ते कल्याण प्रवासात बडनेराजवळ हा प्रकार घडला. अकोला रेल्वे पोलिसांनी तक्रारदार सत्यजीत बर्मन यांची सुटका केला. बर्मन यांनी याप्रकरणी कल्याणच्या लोहमार्ग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर सात कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकाराची चित्रफीतही प्रसारीत झाली असून या प्रकारानंतर रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता आणि उपहारगृह चालकांची मुजोरी उघड झाली आहे.
अंबरनाथ येथील रहिवासी सत्यजीत बर्मन हे हाव़डा मुंबई गितांजली एक्सप्रेसने ५ एप्रिल रोजी प्रवास करत होते. ६ एप्रिल रोजी गितांजली एक्सप्रेस महाराष्ट्रातील बडनेरा स्थानक येण्यापू्र्वी काही प्रवासी आणि उपहारगृहाचे कर्मचारी यांच्यात नियमानुसार ठरलेल्या वजनात पदार्थ देत नसल्याच्या कारणावरून वाद सुरू होते. याबाबत सत्यजीत बर्मन यांनी खाद्यपदार्थ विकणाऱ्या उपहारगृहाच्या कर्मचाऱ्याला जाब विचारला.
त्यावेळी कर्मचाऱ्याने उपहारगृहाच्या डब्यात जाऊन तपासून घ्या असे सांगितले. त्यामुळे बर्मन हे त्या डब्ब्यात गेले असता त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. मात्र कर्मचारी मुजोरपणे मलाच शिवीगाळ करून लागल्याचा आरोप बर्मन यांनी केला आहे. इतकेच नाही तर तेथील कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की करत मारहाण केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी माझा मोबाईल फोनही काढून घेतला, अशीही माहिती बर्मन यांनी दिली आहे.
उपहारगृह डब्ब्यातील कर्मचारी इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी मला डब्ब्यातील एका स्टोर रूमसारख्या जागेत बंद करून ठेवल्याचाही आरोप बर्मन यांनी केला आहे. त्यावेळी नजरूल शेख या सहप्रवाशाने १३९ या टोलफ्री क्रमांकावर तक्रार करून संपूर्ण विषयाची माहिती देत मदतीची याचना केली. पुढे अकोला स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी गाडीच प्रवेश करत माझी सुटका केली, अशी माहिती बर्मन यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली आहे.
या प्रकारानंतर बर्मन यांनी कल्याणपर्यंतचा त्यांचा प्रवास पूर्ण करत कल्याण लोहमार्ग पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात गितांजली एक्सप्रेसमध्ये उपहारगृह चालवणाऱ्या कंपनीच्या सात कर्मचाऱ्यांचा आरोपी म्हणून समावेश आहे. याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी सत्यजीत बर्मन यांनी केली आहे.
प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात
या प्रकारानंतर रेल्वे प्रवासात प्रवाशीच सुरक्षित नसल्याची बाब समोर आली आहे. खाद्यपदार्थ विक्रीवेळी कंत्राटदाराचे कर्मचारी अधिकचे पैसे वसूल करतात. प्रवाशांकडे पर्याय नसल्याने ते अधिकचे पैसे देतात. त्यात त्यांना कमी वजनाचे खाद्यपदार्थ दिले जातात, असा आरोप तक्रारदार सत्यजीत बर्मन यांनी केला आहे. तसेच चालत्या गाडीत कुणी जाब विचारला तर त्यांना मुजोरी दाखवली जाते. कर्मचारीच प्रवाशांना मारहाण करतात, असेही बर्मन यांनी सांगितले आहे.