इसिसच्या संपर्कात असलेल्या तब्बल नऊ आरोपींना दहशतवाद विरोधी पथकाने सोमवारी अटक केली. छापेमारीची ही कारवाई औरंगाबाद आणि मुंब्रा परिसरात करण्यात आली. मुंब्रा परिसरातून अटक करण्यात आलेल्या मजहर शेख याचे वडील रशीद मलबारी उर्फ रशीद शेख हे अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमचे हस्तक असल्याचे समोर आले आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा विश्वासू हस्तक अशी रशीद मलबारीची ओळख आहे. रशीद मलबारी हा छोटा राजनवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील आरोपी असल्याची सूत्रांची माहिती आहे. छोटा राजनवर हल्ला आणि बाळू ढोकरे या गॅंगस्टरच्या हत्येत रशीद मलबारी याचा सहभाग होता. रशीद मलबारी याला ऑगस्ट २०१३ मध्ये पाच वर्षाची शिक्षा झाली होती.
३० मार्च २००९ मध्ये रशीद मलबारी याला अटक करण्यात आली होती. ५३ महिने तो कारागृहात होता त्यानंतर तो जामिनावर सुटला होता. १३ आक्टोंबर २०१७ मध्ये रशीद मलबारी याला कर्नाटक पोलिसांनी काबाका गावातून अटक केली होती. त्यानंतर २०१८ या वर्षात त्याच्यावर कर्नाटक मध्ये एक गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दाऊद-छोटा शकीलच्या इशाऱ्यावर बाळू ढोकरेची हत्या
दाऊद आणि छोटा शकील याच्या इशाऱ्यावरुन रशीद मलबारी याने छोटा राजनचा शार्पशूटर बाळू ढोकरे याची हत्या केली होती. छोटा राजनवर बँकॉकमध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातही रशीद मलबारी उर्फ रशीद शेख याचा सहभागी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रशीद मलबारीवर गंभीर गुन्ह्याची नोंद
– भाजपा युवा नेते आणि तत्कालीन खासदार वरुण गांधी यांच्या हत्येची सुपारी घेतल्याचा आरोप.
– छोटा राजनवरील हल्ल्यानंतर रशीद मलबारी आणि गुरुप्रीतसिंग भुल्लर दोघेही फरार झाले.
– १९९८ मध्ये हुसैन वस्तरा याची हत्या करुन मलबारीचे दुबईत पलायन.
मलबारीचा मुलगा मजहरचे इसीस कनेक्शन
मुंब्रा येथे छापा मारुन एटीएसने चार जणांना अटक केली. यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक रशीद मलबारीचा मुलगा मजहर असल्याने या नऊजणांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष इसिस सोबत संबंध असल्याचा संशय अधिकच बळावला आहे. एटीएस आरोपींची कसून चौकशी करीत आहे.