कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांच्या विषयावरून उच्च न्यायालय संतप्त झाले असताना पालिका हद्दीतील काही साहाय्यक आयुक्त बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात फुटकळ कारणे देऊन टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आल्याने आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी सोमवारी शासन सेवेतून आलेल्या तीन महिला साहाय्यक आयुक्तांच्या प्रभागातून तडकाफडकी बदल्या केल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या अधिकारी महिला बेकायदा बांधकामांवर कारवाई करत नसल्याच्या वाढत्या तक्रारी आयुक्त डाॅ. जाखड यांच्यापर्यंत आल्या होत्या. शासन सेवेतून आलेल्या महिला अधिकारी पालिकेत आणि प्रभागात नवीन असल्याने त्या प्रभागांमध्ये कोणत्याही प्रकारचा दबाव न घेता कठोरपणे काम करतील. प्रभागातील बेकायदा रोखण्यात महत्वाची भूमिका बजावतील त्यामुळे त्यांना प्रभागांमध्ये साहाय्यक आयुक्त पदावर नियुक्त करावे, अशी मागणी वास्तुविशारद संदीप पाटील, इतर नागरिकांना तत्कालीन आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे गेल्या वर्षी केली होती.

हेही वाचा : ठाण्यात शुद्ध पाण्याच्या गुणवत्तेत घसरण पाणी गुणवत्ता प्रमाणात दोन टक्क्यांनी घट

तत्कालीन आयुक्तांनी स्नेहा करपे, सोनम देशमुख, प्रीती गाडे यांना ह, ग आणि अ प्रभागात नियुक्ती दिली होती. जिल्हा नियोजन विकास समितीकडून आलेल्या साहाय्यक आयुक्त निवेदिता पाटील यांनी वेळोवेळी राजकीय दबाव आणून प्रभागात काम करण्यास नकार दिल्याच्या तक्रारी आहेत. याऊलट आयुक्तांवर एका लोकप्रतिनिधीच्या स्वीय साहायकाचा दबाव आणून चांगली पदस्थापना मिळविण्यात त्या सतत प्रयत्नशील असल्याची पालिकेत चर्चा आहे.

ग प्रभागात यापूर्वी कठोर काम करणाऱ्या करपे यांची बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली पश्चिमेत ह प्रभागात साहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती होती. पोलीस बंंदोबस्त मिळत नाही, इमारतीत रहिवास आहे, अशी किरकोळ कारणे देऊन त्या बेकायदा इमारतींवर कारवाई करण्यात अपयशी ठरल्या. ह प्रभागाचे अधीक्षक अरूण पाटील प्रभागातील बेकायदा बांधकामांची इत्यंबूत माहिती देत नसल्याने करपे यांनी पाटील यांना नोटीस बजावली होती.

हेही वाचा : ठाणे : पार्टी करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मित्रांकडून तरूणाला बेदम मारहाण

आयरे प्रभागात अधिक संख्येने बांधकामे सुरू असताना ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त सोनम देशमुख या बांधकामांना नोटिसा पाठविल्या आहेत. पोलीस बंदोबस्त मिळाला की कारवाई करू, अशी आश्वासने तक्रारदारांना देऊन कारवाईस टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी होत्या. अ प्रभागात टिटवाळा परिसरात अधिक संख्येने बेकायदा चाळींची बेकायदा बांधकामे सुरू असताना साहाय्यक आयुक्त प्रीती गाडे कारवाई करण्यात अपयशी ठरल्या होत्या.

बेकायदा बांधकामे रोखण्यात यापूर्वी अपयशी ठरलेले साहाय्यक आयुक्त संजय साबळे यांना क प्रभाग, ब प्रभागाचे साहा्य्यक आयुक्त राजेश सावंत यांना ह आणि ग प्रभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. ह, ग प्रभागांमध्ये निवेदिता पाटील, सुषमा मांडगे यांना नियुक्ती देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. देशमुख यांच्याकडे ब प्रभाग साहाय्यक आयुक्त, करपे यांच्याकडे भांडार, क्रीडा, गाडे यांना घनकचरा विभागात पदभार देण्यात आला आहे.

हेही वाचा : अंबरनाथच्या शिवमंदिरावरील शिल्प निखळले, तज्ज्ञांच्या नाराजीनंतर पुरातत्व खात्याची धावाधाव

अधीक्षक बदलीची मागणी

पालिकेच्या १० प्रभागांमध्ये ठरावीक अधीक्षक वर्षानुवर्ष ठाण मांडून आहेत. बेकायदा बांधकामांना पाठिशी घालण्याचे काम हे अधिकारी करतात, अशा तक्रारी आहेत. आयुक्तांनी त्यांच्या बदल्या करण्याची मागणी जोर धरत आहे. ह प्रभागात चेतन भोईर हा शिपाई तथा सुरक्षा रक्षक बेकायदा बांधकामांची पाठराखण पुढाकार घेत असल्याच्या तक्रारी आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan 3 women assistant commissioners transferred who failed to stop illegal constructions css