कल्याण : रस्त्यावर ठेवलेले सामान वाहतुकीला अडथळा येत आहे. ते बाजुला घेण्यात यावे अशी सूचना एका दुचाकी स्वाराने एका दुकानदाराला केली. त्याचा राग येऊन दुकानदाराने आपल्या तीन साथीदारांच्या साहाय्याने दुचाकीवरील स्वाराला आणि त्यांच्या दोन साथीदारांना बॅट, लाकडी काठीने मारहाण केली. तसेच धारदार शस्त्राचा वापर करून दुचाकीस्वारासह त्यांच्या दोन साथीदारांना गंभीर जखमी केले.
कल्याण पूर्वेतील पिसवली येथील महालक्ष्मी किराणा दुकानाच्या समोर हा प्रकार घडला. याप्रकरणी दुचाकी स्वाराने मानपाडा पोलीस ठाण्यात दुकानदार आणि त्यांचा भाऊ आणि या मारहाणीत त्यांना साथ देणाऱ्या इतर दोन जणांविरुध्द तक्रार केली. पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा : ठाण्यात चिनी मांजाच्या जप्तीसाठी दुकानात धाडी, पालिकेच्या पथकाकडून आतापर्यंत एकूण ४५० दुकानांची तपासणी
पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील माहिती अशी, की दुचाकीवरील तक्रारदार पंकजगिरी गोस्वामी (४०) हे कल्याण पूर्वेतील नेतिवली येथील मलंग रस्ता भागात राहतात. ते नोकरदार आहेत. मंगळवारी दुपारी पंकजगिरी गोस्वामी आपल्या दुचाकीवरून पिसवली गावातून महालक्ष्मी किराणा दुकानासमोरून जात होते. या दुकानातील किराणा साहित्य पोत्यांमधून रस्त्यावर अडथळा होईल अशा पध्दतीने ठेवण्यात आले होते. हे सामान वाहतुकीला अडथळा येत असल्याने दुचाकीस्वार पंकजगिरी गोस्वामी यांनी दुकानदाराला रस्त्यावरील किराणा सामान दुकानाच्या आतील भागात ठेवण्यास सांगितले. त्याचा राग दुकानदाराला आला. यावेळी दुकानदाराने तुम्ही मला असे सांगणारे कोण, असा प्रश्न पंकजगिरी गोस्वामी यांना करून त्यांच्याशी वाद घातला. यावरून गोस्वामी आणि दुकानदार यांच्यात जोरात वाद होऊन दुकानदाराने पंकजगिरी यांना शिवीगाळ करत ठोशाबुक्क्याने मारहाण केली.
ही माहिती पंकजगिरी गोस्वामी यांच्या कुटुंबीयांना माहिती पडली. पंकजगिरी यांचा मुलगा क्रिश गोस्वामी (१८), त्यांचा साथीदार वैभव केशव गायकवाड (१९) वडिलांना का मारहाण केली याचा जाब विचारण्यासाठी किराणा दुकानात आले. त्यावेळी दुकानदाराने त्यांच्याशी वाद घातला. दुकानदारासह इतर तीन जणांनी क्रिश, वैभव आणि पंकजगिरी यांना पुन्हा मारहाण केली. यावेळी धारदार शस्त्र, बॅट, लाकडी काठीचा वापर करण्यात आला. या हल्ल्यात वैभव आणि क्रिश गंभीर जखमी झाले.
जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या बद्दल पंकजगिरी गोस्वामी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात दुकानदार, त्यांचा भाऊ आणि इतर दोन जणांच्या विरुध्द तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ पाऊलबुध्दे याप्रकरणाचा तपास करत आहेत.