कल्याण : कल्याण पश्चिमेतील जोशीबाग भागात एका घराच्या समोर मोकळ्या जागेत एक तीन वर्षाच्या बालकाला त्याच्या आई, वडिलांनी शनिवारी सकाळी बेवारस स्थितीत सोडून दिले आहे. हे बालक एकटेच रस्त्यावर रडत असल्याने एका सामाजिक कार्यकर्ता महिलेने याप्रकरणाची महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी बालकाला बेवारस स्थितीत सोडून देणाऱ्या अनोळखी व्यक्तिंविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण पश्चिमेतील जोशी बागेतील परवेज अल्ली सय्यद यांच्या घरासमोर, सय्यद पॅलेस, न्यू हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे शनिवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान रस्त्यावर एक तीन वर्षाचे बालक बेवारस स्थितीत असून ते रडत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या निलीमा मंगेश सोनवणे यांना मिळाली. परिसरातील रहिवासी, पादचारी नागरिक या बालकाभोवती जमा झाले. या बाळाला याठिकाणी कोणी सोडून दिले याचा शोध घेण्यात आला. पण परिसरात कोणीही आढळून आले नाही.
त्यामुळे आपल्या मुलाचा सांभाळ करण्याऐवजी त्याला रस्त्यावर बेवारस स्थितीत सोडून देऊन त्याच्या पालकांनी त्याचा परित्याग करण्याचा प्रयत्न असल्याचे लक्षात आल्यावर सामाजिक कार्यकर्त्या निलीमा सोनवणे यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार केली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात पालकांविरुध्द अल्पवयीन मुलाची काळजी व संरक्षण कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, साहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक घाटगे, प्रतिभा माळी यांनी घटनास्थळी भेट दिली. सदर मुलाचा ताबा घेण्यात आला. शासकीय बाल संरक्षण व सुधार गृहात या बालकाला ठेवण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे समजते.
या मुलाला जोशी भागातील रस्त्यावर कोणी आणून सोडले याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.