कल्याण – घरात पेस्ट कंट्रोल कामासाठी आलेल्या एका कामगाराने घरातील कुटुंबीयांची नजर चुकवून घरातील ८७ हजार ५०० रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथील हरिहर माधव संकल्प सोसायटीत हा प्रकार सरत्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या महिन्यापासून डोंबिवलीत केबल चालक म्हणून घरात येऊन घरातील किंमती ऐवज चोरून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, वृद्ध यांना लक्ष्य केले जात आहे. या प्रकारानंतर आता चोरटे विविध रुपे घेऊन घरात चोऱ्या करू लागल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

हेही वाचा – कुर्ला बस दुर्घटना चालकामुळेच, संजय मोरेच्या जामिनाला विरोध करताना पोलिसांचा न्यायालयात दावा

या चोरीप्रकरणी रहिवाशाने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या रहिवाशाने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की बुधवारी दुपारी एक वाजता तक्रारदार रहिवाशाच्या सूचनेवरून एक पेस्ट कंट्रोल कामगार खडकपाडा येथील माधव संकल्प सोसायटीतील घरी आला. रहिवाशाने दिलेल्या सूचनेप्रमाणे पेस्ट कंट्रोल कामगाराने घराचे पेस्ट कंट्रोल करण्याचे निश्चित केले. घरातील मुख्य ओटी, आतील खोल्यांचे पेस्ट कंट्रोल झाल्यानंतर कामगाराने घरातील शयन गृहाचे पेस्ट कंट्रोल सुरू केले.

घरात कीटकनाशक फवारणी होत असल्याने कुटुंबीय पेस्ट कंट्रोल कामगारापासून घरात कीटकनाशकाच्या वासाचा त्रास नको म्हणून अंतर ठेऊन होते. शयन गृहात पेस्ट कंट्रोल करत असताना कामगाराने त्या खोलीत कुटुंबीय नाहीत किंवा त्यांचे आपल्याकडे लक्ष नाही हे पाहून त्या खोलीत असलेल्या चाव्या ताब्यात घेतल्या. त्याच खोलीतील बंद कपाट उघडले. बंद कपाटातील तिजोरीत असलेली ३५ हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्याच्या सात ग्रॅम वजनाचे दागिने असा एकूण ८७ हजाराहून अधिक किमतीचा सोन्याचा ऐवज पेस्ट कंट्रोल कामगाराने लबाडीने काढून घेतला. पेस्ट कंट्रोल झाल्यानंतर कुटुंबीयांनी कपाट तपासले तेव्हा त्यात रोख रक्कम, सोन्याचा ऐवज नसल्याचे आढळले. पेस्ट कंट्रोल कामगारानेच ही चोरी केली असल्याचा संशय व्यक्त करून रहिवाशाने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

हेही वाचा – मुंबईतील किमान तापमानात ४ अंशांनी घट

घरात चोरी झाली नसताना, अन्य कोणी घरात आले नसताना रोख रक्कम आणि सोन्याचा ऐवज चोरीस गेल्याने पेस्ट कंट्रोल करण्यासाठी आलेल्या कामगारानेच ही चोरी केल्याचा कुटुंबीयांना संशय आहे. याप्रकरणाचा पोलीस उपनिरीक्षक ए. एस. पवार तपास करत आहेत. या कामागाराचे नाव, त्याचा संपर्क क्रमांक कुटुंबीयांकडे आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan a worker who came for pest control in a house committed theft ssb