कल्याण : मुरबा़ड तालुका पंचायत समितीचे माजी सभापती श्रीकांत धुमाळ आणि त्यांच्या साथीदारांनी शुक्रवारी संध्याकाळी बारवी धरणाजवळील एका गाव हद्दीत सुशील भोईर या तरूणाची निर्घृण हत्या केली. मारेकऱ्यांनी सुशीलचे दोन्ही हात तलवारीने कापून त्याच्यावर हल्ला चढविल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने मुरबाड परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मुरबाड पोलीस ठाण्यात या हत्येप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले, मारेकरी श्रीकांत धुमाळ हे मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती आहेत. धुमाळ आणि मयत सुशील भोईर यांच्यात यापूर्वीचा काही वाद होता. या वादातून भोईर, धुमाळ यांच्यात धुसफूस सुरू होती. भोईर हे बारवी धरणा जवळील देवपे गावचे रहिवासी आहेत.
सुशील भोईर हे शुक्रवारी संध्याकाळी बारवी धरण परिसरातील रस्त्यावरून एका रिक्षातून चालले होते. त्याचवेळी त्यांच्या समोरून माजी सभापती धुमाळ हे आपल्या साथीदारांसह एका मोटारीतून आले. त्यांनी सुशील रिक्षात असल्याचे पाहताच त्यांनी रिक्षा अडवली. त्यांनी सुशीलला रिक्षातून खेचून बाहेर काढले. त्याच्यावर तलवारीने हल्ला चढविला. त्याचे दोन्ही हात छाटण्यात आले. अचानक झालेल्या या हल्ल्याने आणि एकटाच असल्याने तो मारेकऱ्यांना प्रतिवाद करू शकला नाही. सुशीलचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती तात्काळ मुरबाड पोलिसांना देण्यात आली. हत्येनंतर मारेकरी पळून गेले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.