कल्याण : वाहतुकीचे नियम धुडकावून वाहने चालविणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर कल्याणमध्ये वाहतूक विभागाने जोरदार कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन दिवसात शहराच्या विविध भागात वाहतूक विभागाच्या पथकाने ४९३ वाहन चालकांवर कारवाई करुन पाच लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती कल्याण वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी दिली.
शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. विद्यार्थी, वृध्द, ज्येष्ठ रस्ता ओलांडत असताना सुध्दा अनेक वाहन चालक वाहने सुसाट चालवितात. त्यामुळे अपघाताची भिती असते. पाऊस सुरू झाला आहे. काही वाहन चालक मद्यपान करुन वाहन चालवून अपघात करतात. अशा सर्व प्रकारच्या वाहन चालकांवर नियंत्रण असावे, या उद्देशातून कल्याण वाहतूक विभागाने कल्याण शहरातील दुर्गाडी, खडकपाडा चौक, गंधारे पूल, शिवाजी चौक, लालचौकी, अंतर्गत रस्ते भागात वाहन तपासणी मोहीम सुरू केली आहे, असे बने यांनी सांगितले.
हेही वाचा… भिवंडी पालिकेतील १८ माजी नगरसेवक सहा वर्षांसाठी अपात्र
शिरस्त्राण न घालता वाहने चालविणे २६१, आसन पट्टा न लावता वाहन चालविणे ४०, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे १० चालक, दुचाकीवरुन तीन जणांनी प्रवास करणे पाच, रिक्षा चालकाने गणवेश न घालता वाहन चालविणे १०, दर्शक न पाळता पुढे निघून जाणे १० अशा मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे.
हेही वाचा… ठाण्यातील प्रसिद्ध काठ अन घाट उपाहारगृहाला आग
या कारवाईत २५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अचानक एखाद्या रस्ते, चौकात जाऊन तेथे वाहन तपासणी मोहीम सुरू केली जाते. या कारवाईत मोटार, रिक्षा, अवजड, दुचाकी अशी प्रकारची वाहने तपासली जातात. जे वाहन चालक कसूरदार आहेत त्यांच्यावर ई चलानव्दारे तर काही जणांकडून घटनास्थळी दंड वसूल केला जातो. एखादा वाहन चालक सतत वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असेल तर त्याला न्यायालयात हजर राहण्याची कारवाई केली जाते. तसेच, आरटीओ विभागाला अशा वाहन चालकाची माहिती देण्याचा निर्णय घेतला आहे, असे पोलीस निरीक्षक बने यांनी सांगितले.
हेही वाचा… ठाणे: शिळफाटा मार्गावर वाहतूक कोंडी
“वाहतुकीचे नियम न पाळता वाहने चालविणाऱ्यांवर नियंत्रण असावे म्हणून कल्याण मध्ये वाहन तपासणी मोहीम सुरू केली आहे. अनेक वाहन चालक बेशिस्तीने वाहने चालवून अपघात घडवून आणतात. हे प्रकार रोखण्याचा या मोहिमेमागील उद्देश आहे.” – गिरीश बने, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, कल्याण.