कल्याण : कल्याण पूर्व भागात मागील काही वर्षापासून दहशतीचे वातावरण निर्माण करून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करणाऱ्या रूपेश कनोजिया या सराईत गुन्हेगाराला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विषयी नागरिकांमध्ये असलेली भीती दूर करण्यासाठी पोलिसांनी त्याची सोमवारी कल्याण पूर्व भागात रस्त्यावरून धिंड काढली. त्याच्यावर एकूण आठ गुन्हे दाखल असल्याने त्याला तडीपार करण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या आहेत.
याशिवाय, कनोजिया याच्यावर महाराष्ट्र झोप़डपट्टी दादा कायद्याने कारवाई करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. मागील काही वर्षापासून रूपेश कनोजिया कल्याण पूर्व भागातील विविध भागात दादागिरी, दमदाटी, दहशत पसरविणे असे प्रकार करतो. शस्त्राचा वापर करून एखाद्यावर हल्ला करणे, निरपराध पादचाऱ्याला धमकाणे, रात्रीच्या वेळेत शांततेचा भंग करणे, असे प्रकार रूपेशकडून सातत्याने होत होते.
हेही वाचा : राज्य व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत नागपूर, मुंबईची बाजी; महिला गटात नागपूर, तर पुरूष गटात मुंबई विजयी
कोळसेवाडी पोलिसांनी रूपेश विरूध्द एकूण यापूर्वी आठ गुन्हे दाखल केले आहेत. त्याला अटकही केली होती. तो जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा गुंडगिरी करत होता. अलीकडे रूपेशने पुन्हा धुमाकुळ घालण्यास सुरूवात केली होती. याविषयी तक्रारी वाढल्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या आदेशावरून रूपेशला पोलिसांनी अटक केली.
हेही वाचा : विठ्ठलवाडी- कल्याण नगर उन्नत मार्गाला मंजुरी, एमएमआरडीएकडून ६४२.९८ कोटींची प्रशासकीय मान्यता
नागरिकांमध्ये त्याच्या विषयी असलेली भीती दूर करण्यासाठी त्याची कल्याण पूर्व भागात धिंड काढली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी जमली होती. रूपेशला अटक केल्याने कल्याण पूर्व भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. “कल्याण पूर्व भागात तरूणांची एक गन्हेगार टोळी तयार करण्यासाठी रूपेश प्रयत्नशील होता. रूपेशला तडीपार करण्यासाठी आणि विविध कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत”, असे वरिष्ठ निरीक्षक शिरशाठ यांनी सांगितले.