कल्याण: गोमांस असलेला टेम्पो पोलिसांना पकडून दिला, या रागातून दोन भावांनी टेम्पो पकडून देणाऱ्या अखिल भारतीय गौ रक्षा महासंघाच्या एका कार्यकर्त्याचे मंगळवारी अपहरण केले. त्याला कल्याण मधील दुर्गाडी किल्ल्याजवळील एक तबेल्यात नेऊन बेदम मारहाण केली. पुन्हा गोमांस असलेला टेम्पो पोलिसांना पकडून दिला तर जिवंत गाडण्याची धमकी दोन्ही भावांनी गौ रक्षा महासंघाच्या कार्यकर्त्याला दिली. या प्रकाराने गौ रक्षा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अखिल भारतीय गौ रक्षा महासंघाचे कार्यकर्ते संजय रामसंजीवन सुमन (३०) असे अपहरण करून मारहाण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. ते उल्हासनगरमध्ये राहतात. महासंघाचे काम करून ते नोकरीही करतात. असलम मुल्ला आणि सॅम अशी मारहाण करणाऱ्या भावांची नावे आहेत. गाई, बैल, म्हशी यांची तस्करी काही व्यावसायिक करतात. या प्राण्यांची कत्तल होऊ नये, त्यांचे संरक्षण, या प्राण्यांच्या मांसाची तस्करी होऊ नये म्हणून गौ रक्षा महासंघाचे कार्यकर्ते प्रयत्नशील असतात.

हेही वाचा : सावत्र भावाची हत्या करणाऱ्यास सश्रम कारावास, उल्हासनगरमध्ये जमिनीच्या वादातून झाली होती हत्या

आरोपी असलम आणि सॅम यांनी गोमांसाची तस्करी करून ते मांस टेम्पो मधून विकण्यासाठी चालविले होते. ही माहिती अखिल भारतीय गौ रक्षा महासंघाचे कार्यकर्ते तक्रारदार संजय सुमन यांना लागली. त्यांनी पाळत ठेऊन गोमांसाची तस्करी होत असलेला टेम्पो वावी पोलिसांना पकडून दिला. पोलिसांनी आरोपींवर या बेकायदा मांस तस्करीप्रकरणी कारवाई केली.

या गोष्टीचा आरोपी असलम, सॅम यांना राग आला. त्यांनी गौ रक्षा महासंघाचे सुमन यांना धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी सकाळी तक्रारदार संजय सुमन हे त्यांच्या मोटारीमधून दुर्गाडी किल्ल्या जवळील नॅशनल उर्दू हायस्कूल समोरील रस्त्यावरील गोविंदवाडी वळण रस्त्याने कल्याण येथे येत होते. या रस्त्यावर अगोदरच पाळत ठेऊन असलेल्या आरोपी असलम, सॅम यांनी उर्दू हायस्कूल येथे सुमन यांची मोटार अडवली. त्यांना जबरदस्तीने मोटारीतून उतरविले. त्यांना शिवीगाळ करत जबरदस्तीने एका रिक्षेमध्ये बसवून गोविंदवाडी येथील एका तबेल्यात नेले. तेथे त्यांना बांबूच्या काठीने बेदम मारहाण केली. आमचा गोमांसाचा टेम्पो पकडून दिल्याने तुझ्यामुळे खूप नुकसान झाले, असे म्हणत शिवीगाळ करत दोघांनी सुमन यांना आता पुन्हा अशाप्रकारे आमचा गोमांसाचा टेम्पो पकडून देण्याची हिम्मत केली तर तुला जिवंत गाडल्या शिवाय राहणार नाही, अशी धमकी सुमन यांना दिली.

हेही वाचा : कल्याण: २७ गावांमधील पथदिवे कामांसाठी फेरनिविदा

या प्रकारानंतर आरोपींनी सुमन यांना तबेल्यातून बाहेर काढले. त्यांना एका मोटारीत बसविले आणि त्यांना पत्रीपूल भागात सोडून दिले. तेथून आरोपींनी पळ काढला. या घडल्या प्रकाराबद्दल संजय सुमन यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan akhilbhartiya gauraksha mahasangh worker beaten up for giving information about beef tempo to police css