कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरांमधील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहचत आहे. ही हवा आरोग्याला हानीकारक आहे. त्यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी नागरिकांनी प्रदूषण करणारे फटाके फोडू नयेत. प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करावी, अशी माहिती देत कल्याण-डोंबिवली पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी शहराच्या विविध भागात जनजागृती फेऱ्या सुरू केल्या आहेत.
कल्याण, डोंबिवलीतील हवेचा दर्जा चांगला राहावा म्हणून पालिकेने विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरिकांनाही फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणाची माहिती व्हावी. त्यांच्यामध्ये जागृती करावी या उद्देशातून आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या आदेशांवरून पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रशासनाधिकारी रंजना राव, शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गटसमुह तयार केले आहेत. हे विद्यार्थी शाळा परिसरातील वस्तींमध्ये जनजागृती फेरी काढून, घोषवाक्य फलक हातात घेऊन, घोषणा देत जागृती करत आहेत.
हेही वाचा : ठाणे : घोडबंदर मार्गावर अपघात, चालक जखमी
नको फटाक्यांची धूळ आणि धूर, दिव्यांची रोषणाई करूया भरपूर, आवाज आणि धुराच्या फटाक्यांना द्या नकार, प्रदूषण मुक्त वातावरणाचा करूया स्वीकार, आता आम्ही जागे होणार नाही, तर उद्या स्वच्छ वायू राहणार नाही, अशा घोषणा विद्यार्थ्यांकडून दिल्या जात आहेत. विद्यार्थ्यांनी दिवाळी सणाच्या काळात प्रदूषण करणारे फटाके न फोडण्याचा संकल्प सोडला आहे.