कल्याण : एका गुन्ह्याच्या प्रकरणात एका तक्रारदाराकडून सात लाख रूपयांची लाच मागणारा आणि तडजोडीने पाच लाख रूपये स्वीकारण्यास तयार झालेला कल्याण मधील महात्मा फुले पोलीस ठाण्यातील हवालदार सुचित निवृत्ती टिकेकर (४०) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने भ्रष्टाचार प्रतिबंंधक कायद्याने बुधवारी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी सांगितले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या मित्राच्या मेव्हुण्या विरुध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या प्रकरणात मेव्हुण्याला आरोपी करण्यात येऊ नये म्हणून तक्रारदार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हवालदार सुचित टिकेकर यांच्याकडे मागणी केली होती. मेव्हुण्याला दाखल तक्रारीत आरोपी करायचे नसेल तर ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी सात लाख रूपये लागतील, अशी मागणी हवालदार टिकेकर यांनी तक्रारदाराकडे केली.
हे ही वाचा… ठाणे जिल्ह्यात डेंग्यु, मलेरियाने डोके वर काढले; रूग्ण संख्येत वाढ, काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
गेल्या महिन्यात हा प्रकार सुरू होता. ही रक्कम कमी करण्याची मागणी तक्रारदाराने केली, पण त्याला हवालदार टिकेकर तयार होत नव्हता. अखेर टिकेकर सात ऐवजी पाच लाख रूपये स्वीकारण्यास तयार झाला. टिकेकर लाच मागत असल्याने हा विषय तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ठाणे विभागाचे अधीक्षक सुनील लोखंडे यांंना कळविला. लोखंडे यांच्या आदेशावरून अपर पोलीस अधीक्षक गजानन राठोड, महेश तरडे, पोलीस निरीक्षक विजय कावळे यांच्या पथकाने टिकेकर यांंचे तक्रारदाराशी होणाऱ्या संभाषणावर नजर ठेवली.
हे ही वाचा… ठाण्यात पाणी टंचाईचे संकटात भर, मुख्य वितरण व्यवस्थेमध्ये बिघाड
टिकेकर तक्रारदाराकडे लाच मागत असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी यासंदर्भातचे तांंत्रिक पुरावे जमा केले. त्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विजय कावळे यांंनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात बुधवारी हवालदार सुचित टिकेकर यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला.