कल्याण : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. सामान्य पादचारी, प्रवाशांना या गुन्हेगारीचे सर्वाधिक चटके बसत आहेत. मागील सहा महिन्यांत अनेक लुटमारीच्या घटना कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात घडल्या आहेत. अशा परिस्थितीत गुरुवारी रात्री बारा वाजता एक कष्टकरी मजुराला तीन चोरट्यांनी कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर अडविले. त्याच्यावर चाकू हल्ला करून त्याच्या जवळील दोन हजार रुपये लुटले आहेत.
हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजपचा दावा का? भाजपच्या विस्तारवादाने शिंदेसेना भयग्रस्त?
खुशीराम मिना (२२) असे कष्टकरी मजुराचे नाव आहे. तो मुळचा राजस्थानमधील रहिवासी आहे. तो सध्या भिवंडी जवळील पडघा ढोलेगाव येथे राहतो. कल्याण, भिवंडी परिसरात मजुरीची कामे करून तो कुटुंबियांची उपजिवीका करतो. कल्याणमध्ये दिवसभर मजुरीचे काम केल्यानंतर तक्रारदार खुशीराम मीना गुरुवारी रात्री कल्याण पश्चिमेतील दरबार हाॅटेल समोरील स्काॅयवाॅकवरून भिवंडीला जाणारी रिक्षा किंवा इतर वाहन पकडण्यासाठी जात होता. त्यावेळी स्कायवाॅकवर १६ ते १८ वयोगटातील तीन तरूणांनी त्याला अडविले. त्याच्यावर अचानक धारदार चाकुने हल्ला करून त्याला दुखापत केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने खुशीराम घाबरला. त्याने या दोन तरूणांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न केला, पण त्याला दोन्ही आरोपींनी पकडून ठेवले. त्याला बेदम मारहाण केली. त्यांला चाकुने गंभीर दुखापत करून खुशीरामने दिवसभर मजुरी करून मिळविलेले दोन हजार रूपये तिन्ही भामट्यांनी खुशीरामच्या खिशातून जबरदस्तीने काढून घेतले. तक्रारदाराने त्यास प्रतिकार केला पण त्याचा उपयोग झाला नाही. कोणीही प्रवासी तक्रारदाराच्या मदतीला धावले नाही. खुशीरामने रात्रीच महात्मा फुले पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
रात्री अकरा वाजल्यानंतर कल्याण रेल्वे स्थानकाच्या बाहेर अनेक भुरटे चोर पादचाऱ्यांना लुटण्यासाठी फिरत असतात. यामध्ये काही भुरट्या महिलांचा समावेश आहे. एक टोळीच प्रवाशांना लुटण्याचे हे काम करते. कल्याण रेल्वे स्थानक हा वर्दळीचा भाग असुनही रात्रीच्या वेळेत या भागात प्रवाशांना लुटण्याचे प्रकार घडत आहेत. हे माहिती असुनही स्थानिक पोलीस या भागात रात्रीची गस्त वाढवित नसल्याने, याठिकाणी कायमस्वरुपी पोलीस तैनात करत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.