कल्याण: अनेक वर्ष जमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादातून खडवली जवळील उतणे गावातील शेतकरी बंधूंनी फळेगाव मधील वृध्द शेतकरी चांगदेव कचरू बनकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत चांगदेव गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर कल्याण मधील एका खासगी रुग्णालयात महिनाभर उपचार सुरू होते. या उपचारा दरम्यान चांगदेव यांचा मृत्यू झाला आहे. बाळाराम नामदेव टोके, प्रल्हाद नामदेव टोके, सागर बाळाराम टोके, अमित बाळाराम टोके अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व शेतकरी उतणे गावातील रहिवासी आहेत. टिटवाळा पोलीस ठाण्यात या खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांंगदेव यांचा मुलगा नीलेश (३०) यांनी या खून प्रकरणी तक्रार केली आहे. पोलिसांंनी सांगितले, गेल्या महिन्यात सकाळच्या वेळेत चांगदेव यांची पत्नी उषाबाई, मजूर सविता आसरे त्यांच्या शेतात काम करत होत्या. यावेळी तेथे आरोपी गटाने आले. त्यांनी उषाबाईला ही जमीन आमच्या मालकीची आहे. या शेतात काय करता असे बोलून त्यांना तेथून दमदाटी करून हाकलून लावले. हा प्रकार उषाबाई यांनी पती चांगदेव, मुलांना सांंगितला.
हेही वाचा : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ठाणे, भिवंडीत वाहतूक बदल
त्याच दिवशी दुपारी तीन वाजता पुन्हा उषाबाई, सविता हिच्यासह शेतावर पुन्हा कामासाठी आल्या. त्यावेळी पुन्हा टोके कुटुंब तेथे आले. त्यांनी उषाबाई यांना शिवीगाळ केली. मोठ्याने ओरडा करून शेतात धिंगाणा केला. हा आवाज ऐकून वृध्द चांगदेव आणि त्यांची मुले शेतावर गेली. त्यावेळी ही जमीन आमची असूुन तेथे कसायला आम्हाला का विरोध करता, असा प्रश्न चांगदेव यांनी आरोपींना केला. त्याचा राग आरोपी अमित टोकेला आला. त्याने हातामधील लोखंंडी सळई वृध्द शेतकरी चांगदेव यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर दुखापत केली. चांगदेव रक्ताच्या थारोळ्यात पडले. आरोपींनी चांगदेव यांच्या पत्नी उषाबाई आणि त्यांच्या साथीदारांना बेदम मारहाण केली. चांगदेव यांना तातडीने कल्याण मधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर महिनाभर उपचार सुरू होते. परंंतु, त्यांची तब्येत खालावल्याने उपचार सुरू असताना चांगदेव बनकरे यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. या प्रकरणी आता खुनाचा गुन्हा आरोपींवर दाखल करा, अशी मागणी बनकरे कुटुंबीयांनी सुरू केली आहे.