कल्याण : पैसे आणि मोबाईलची मागणी पूर्ण केली नाही म्हणून शनिवारी रात्री साडे बारा वाजता कल्याण पूर्वेतील खडेगोळवली भागात दोन जणांनी ठाण्यातील एका मोटार चालकावर चाकूचा हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीषकुमार ओमप्रकाश मिश्रा (३३) असे तक्रारदाराचे नाव आहे. तो ठाण्यातील घोडबंदर भागात राहतो. अरबाज शेख आणि त्याचा एक साथीदार हे या प्रकरणात आरोपी आहेत. खडेगोळवली प्रथमेश नगर भागात ही घटना घडली आहे.
पोलिसांनी सांगितले, तक्रारदार मनीषकुमार हे कल्याण पूर्वेतील खडेगोळवली भागातील प्रथमेशनगर भागात राहत असलेल्या जगदीश शुक्ल यांच्याकडे शनिवारी रात्री मुक्काम करण्यासाठी मोटारीने येत होते. रात्री साडे बाराच्या सुमारास मनीषकुमार कार घेऊन प्रथमेशनगर भागातून जात होते. त्यांना अचानक आरोपी अरबाज आणि त्याच्या साथीदाराने अडविले. मनीषकुमार यांनी खिडकीची काच खाली घेतली. त्यावेळी आरोपींनी मनीषकुमार यांच्याकडे पैसे आणि मोबाईल देण्याची मागणी केली.
हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी कल्याणमध्ये, विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण
आपल्याकडे पैसे नाहीत आणि मोबाईल आपण देऊ शकत नाही, असे तक्रारदाराने सांगताच आरोपी अरबाजला राग आला. त्याने चालकाला काही कळण्या्च्या आत त्याच्या मानेवर आणि पोटारवर चाकुने वार केले. मनीषकुमार यांनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला. ते ऐकत नव्हते. अरबाज शेख आणि त्याच्या साथीदाराने लाकडी दांडक्याने मनीषकुमार यांच्या वाहनाची काच फोडली. दुखापत झाल्याने तक्रारदाराने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आरोपींविरूध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.