कल्याण – कल्याण पूर्व भागात भिंतीवरील कमळ चिन्ह रंगविण्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची आणि त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. शिंदे समर्थकांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. चक्कीनाका टेकडी भागात हा प्रकार बुधवारी घडला.
शिवसेनेने आपल्या नगरसेवक, कार्यकर्त्यांना आवरावे, अन्यथा आम्ही हात सैल सोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजपाचे कल्याण पूर्व शहराध्यक्ष संजय मोरे यांनी शिंदे समर्थकांना दिला आहे. राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता असली तरी स्थानिक पातळीवर आलबेल नसल्याचे कल्याणमधील या घटनेने स्पष्ट झाले आहे. निवडणुकीची ही नांदी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कल्याण पूर्व भागातील चक्कीनाका टेकडी भागात भाजपा कार्यकर्त्यांकडून सार्वजनिक ठिकाणच्या भिंतीवर पक्षाचे कमळ चिन्ह रंगविण्याची कामे सुरू आहेत.
हेही वाचा – ठाणे : कामगारांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन
हेही वाचा – ठाणे : पोलीस ठाण्याच्या आवारात महिला पोलिसाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की
यावेळी कल्याण पूर्वेतील तिसगाव-चक्कीनाका भागातील शिवसेनेचे माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचे समर्थक भाजपा कार्यकर्ते कमळ चिन्ह रंगवित असल्याच्या ठिकाणी आले. त्यांनी या भागात तुम्ही हे चिन्ह का काढत आहात, असा प्रश्न उपस्थित करत भाजपा कार्यकर्त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. शेट्टी यांच्या इशाऱ्यावरून हा प्रकार घडला आहे, असा आरोप भाजपाचे मोरे यांनी केला आहे. आम्हीही या प्रकरणात शांत राहणार नाहीत. संबंधितांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहोत, असे भाजपाचे मोरे यांनी सांगितले. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.