लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: कल्याण पश्चिमेतील फडके मैदान, म्हसोबा मैदान भागातील सुस्थितीत असलेल्या डांबरीकरणाचे रस्ते काँक्रीटीकरणाचे करण्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद नसताना बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी या कामाच्या बनावट नस्ती तयार केल्या. या बनावट नस्ती प्रकरणी कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिल्यानंतर त्या नस्ती गायब करण्यात आल्या. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी. ठेकेदारावर तात्काळ फौजदारी कारवाई करुन त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि या प्रकरणात शिपाई, लिपिक यांचे केलेले निलंबन रद्द करावे, अशा मागण्या म्युनसिपल कर्मचारी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे बुधवारी केल्या.
स्थानिक आणि शासकीय सेवेतून आलेला कर्मचारी असा दुजाभाव या प्रकरणात करू नये. या प्रकरणात जे कर्मचारी सकृतदर्शनी दोषी आढळतील त्यांच्यावर जरुर प्रशासनाने कारवाई करावी. कारवाईचा देखावा म्हणून किरकोळ कर्मचाऱ्यांना या प्रकरणात निलंबित करू नये. या प्रकरणातील ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही प्रशासनाने करावी, अशी मागणी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने केली.
हेही वाचा… भातसा कालव्याला भगदाड
म्युनसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाळ हरादस, उपाध्यक्ष सचिन बासरे, तात्यासाहेब माने, कोषाध्यक्ष सुरेश तेलवणे यांनी बुधवारी आयुक्तांची रस्ते बांधकामाच्या बनावट नस्ती, त्या गायब करणे प्रकरणी भेट घेतली. ‘लोकसत्ता’ने हे प्रकरण उघडकीला आणले आहे.
हेही वाचा… ठाण्यात सिनेवंडर मॉलमध्ये आग, जीवितहानी टळली
कारवाईचे आश्वासन
या नस्तींप्रकरणी ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन आयक्त डाॅ. दांगडे यांनी कर्मचारी सेनेच्या शिष्टमंडळाला दिले. कार्यालयातील नस्ती अधिकाऱ्याच्या दालनातून ठेकेदाराच्या ताब्यात बाहेर जातेच कशी, असा प्रश्न करुन यामध्ये एक मोठी साखळी आहे. ती मोडून काढण्याचे आवाहन अध्यक्ष हरदास यांनी आयुक्तांना केले. वरिष्ठाचा आदेश असल्याशिवाय शिपाई या नस्ती ठेकेदाराच्या ताब्यात देणार नाही. निलंबित शिपाई लक्ष्मण दिवेकर यांच्यावर खूप दबाव आल्याने त्यांनी त्या नस्ती ठेकेदाराच्या ताब्यात दिल्या. या मागचा खलनायक अधिकारी कोण तो शोधून त्या अधिकऱ्यावर कारवाई घेण्यात यावी, अशी मागणी उपाध्यक्ष सचिन बासरे, तात्यासाहेब माने यांनी केली.
या प्रकरणात शिपाई, लिपिक यांना निलंबित करण्यात आल्याने स्थानिक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. सामान्य प्रशासन अधीक्षकांकडून अभियंत्यांना कारणे दाखवा नोटिसा पाठविण्यासाठी या नस्ती साहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे यांच्या दालनात पाठविण्यात आल्या होत्या. सात दिवस या दालनात कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर नस्ती हरविल्या.
लेखा अभियांत्रिकी विभागाच्या दालनातून या नस्ती शिपाई दिवेकर ठेकेदार आनंत पगार यांना देत असल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात शिपायाला निलंबित करण्यात आले. या नस्तींच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या साहाय्यक आयुक्तांवर कोणतीही कारवाई न केल्याने कर्मचारी, संघटना पदाधिकारी नाराज आहेत. ठेकेदार आनंत त्र्यंबक पवार हे नियमित पालिकेत फिरत असतात. आयुक्तांनी त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.
“ नस्ती गायब प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करुन या प्रकरणातील मुख्य सुत्रधारावर कारवाई, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आयु्क्तांकडे केली आहे. ” -बाळ हरदास, अध्यक्ष, म्युनसिपल कर्मचारी कामगार सेना.