कल्याण: उल्हासनगरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणपती आगमन मिरवणुकीची परवानगी न घेता रविवारी मिरवणूक काढली. मिरवणुकीमुळे शहरात वाहतूक कोंडी झाली. तसेच कर्णकर्कश वाद्ये वाजवून सर्वोच्च न्यायालयाच्या आणि ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशाचा भंग केल्याने उल्हासनगर पोलिसांनी संबंधित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांवर सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.

सेव्हन स्टार मित्र मंडळ असे गुन्हा दाखल मंडळाचे नाव आहे. या मंडळाचे अध्यक्ष राकेश मनसुखभाई पटेल (३२), उपाध्यक्ष रवी लालचंद आहुजा (३१) आणि मंडळाच्या इतर पदाधिकाऱ्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांच्या आदेशावरून हवालदार अशोक बारगजे यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र पोलीस अधिनियमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : सीएसएमटी – दिवा लोकलसाठी दिवेकरांचे हाताला काळ्या फिती बांधून आंदोलन

पोलिसांनी सांगितले, उल्हासनगरमध्ये सेव्हन स्टार मित्र मंडळातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला होता. या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष राकेश पटेल यांच्या सूचनेवरून रविवारी गणपती कारखान्यातून आपली मखरात प्रतिष्ठापना करण्यात येणारी मूर्ती आणण्याचा निर्णय घेतला. ही मूर्ती वाजतगाजत नेण्यात येणार असल्याने सेव्हन स्टार मित्र मंडळाने पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक होते. परंतु, सेव्हन स्टार मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांची परवानगी नाहीच, पण पोलिसांना अंधारात ठेऊन रविवारी संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत शहरातील मुख्य रस्त्यांवरून गणपती आगमनाची मिरवणूक काढली.

ऐन गर्दीच्या संध्याकाळच्या वेळेत ही मिरवणूक काढण्यात आल्याने शहरातील मुख्य, अंतर्गत रस्त्यांवर तुफान वाहन कोंडी झाली. या मिरवणुकीत ढोल, ताशे, ब्रास बॅन्ड आणि इतर वाद्ये कर्णकर्कश, आवाजाची मर्यादा ओलांडून वाजवली जात होती. उल्हासनगर पोलीस आणि वाहतूक पोलिसांची अचानक ही मिरवणूक रस्त्यावर आल्याने तारांबळ उडाली. वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांची दमछाक झाली. अखेर नियमबाह्य कृती करून सेव्हन स्टार मित्र मंडळाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन, ठाणे पोलीस आयुक्तांच्या पाचपेक्षा अधिक व्यक्तिंनी विनापरवाना एकत्र येणे या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून उल्हासनगर पोलिसांनी सेव्हन स्टार मित्र मंडळा विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : ठाणे : वाहतुक शाखेच्या प्रमुखपदी कोणाची वर्णी? डॉ. विनयकुमार राठोड यांच्या बदलीनंतर पोलीस दलात कुजबुज

डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागात व्दारका हाॅटेल ते जोंधळे हायस्कूल दरम्यानच्या रस्त्यावर मागील काही वर्ष गोकुळ अष्टमीनंतर डोंबिवलीतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणपती आगमनाची मिरवणूक काढून संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहन कोंडी करतात. ही मंडळे पोलीस, वाहतूक पोलिसांना जुमानत नाहीत. या मिरवणुकीमुळे डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात कोंडी होते. या कोंडीत कामावरून घरी परतणारा, शाळकरी विद्यार्थी अडकून पडतात. त्यामुळे यावेळी डोंबिवली पोलीस, वाहतूक पोलिसांनी उल्हासनगर पोलिसांसारखी सजगता दाखविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.