कल्याण – आपली मुलगी सतरा वर्षाची आहे, हे माहिती असुनही कल्याणमधील एका कुटुंबातील आई, वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीचा विवाह पुणे शहरालगतच्या विस्तारित परिसरात राहत असलेल्या एका २५ वर्षाच्या तरूणाबरोबर लावला. लग्नानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर हा बालविवाहाचा प्रकार उघड झाल्यानंतर कल्याणमधील बाजारपेठ पोलिसांना मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे आई, वडील, अल्पवयीन मुलीचा पती, तिचे सासु, सासरे यांच्या विरुध्द बाल विवाह प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जानेवारी २०२४ ते ४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यात पीडित मुलीच्या घरी तिच्या आई, वडिलांनी लपुनछपून हा बालविवाह पुणे येथील एका तरूणाबरोबर लावून दिला. बाजारपेठ पोलीस ठाण्यातील तक्रारीत पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर गोरे यांनी म्हटले आहे, की कल्याण मधील एका परिसरात ३५ ते ३८ वयोगट असलेले आई, वडील राहतात. त्यांना सतरा वर्षाची मुलगी होती. आपली मुलगी अल्पवयीन आहे हे माहिती असुनही त्यांनी तिचे लग्न पुणे परिसरातील एका २५ वर्षाच्या तरूणाबरोबर ठरवले.

तरूणाच्या आई, वडिलांनी या विवाहाला पसंती दिली. दोन्ही कुटुंबीयांची लग्नाला संमती झाल्यावर मागील वर्षी जानेवारी महिन्यात पीडित मुलीच्या घरी तिचा बालविवाह पुण्यातील तरूणाबरोबर लावून देण्यात आला. लग्नानंंतर पीडित मुलगी गर्भवती राहिली. हा सगळा बालविवाहाचा प्रकार उघडकीला आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी केली. त्यावेळी एका सतरा वर्षाच्या मुलीचा विवाह एका २५ वर्षाच्या तरूणा बरोबर आई, वडिलांनी लावून दिला असल्याचे, बाल अत्याचाराचा हा प्रकार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या सगळ्या प्रकाराला पीडित मुलीचे आई, वडील, मुलीचे सासु, सासरे, पीडित मुलीचा पती हे सर्व जबाबदार असल्याने पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्याने पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

साहाय्यक पोलीस निरीक्षक सुधर्म सावंत, पोलीस निरीक्षक लक्ष्मण साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. दोन वर्षापूर्वी कल्याणमधील एका भागात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात येत असल्याचा प्रकार काही सामाजिक संस्थांनी उघडकीला आणला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कल्याणमधील एका विशिष्ट भागात हे बालविवाहाचे प्रकार लपूनछपून होत असल्याच्या काही सामाजिक संस्थांच्या तक्रारी आहेत.

Story img Loader