कल्याण: कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथील मलंगरोड ते चिंचपाडा-उल्हासनगर या १०० फुटी रस्त्याने बाधित माधव इमारतीमधील रहिवाशांनी आमचे पुनर्वसन करताना कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने आमच्यावर अन्याय केला असल्याची खंत व्यक्त केली आहे. मागील १३ वर्षापूर्वी पालिकेने आम्हाला माधव इमारत विकास आराखड्याने बाधित होत असल्याने खाली करण्याच्या नोटिसा दिल्या. तेव्हापासून आम्ही रहिवासी पालिकेत इतरत्र स्थलांतरित होण्यास तयार आहोत. पण आमच्या मनपसंत जागेप्रमाणे, आमच्या आहे त्या क्षेत्रफळाच्या सदनिका आम्हाला इतरत्र द्याव्यात, अशी मागणी पालिकेकडे करत आहोत. वेळोवेळी वेगळे आयुक्त आले. अधिकारी बदलले त्यामुळे आमच्या मागणीची कधीच कोणी गांभीर्याने दखल घेतली नाही, असे रहिवाशांनी सांगितले.
अलीकडेच आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांची रहिवाशांनी भेट घेतली होती. माधव इमारतीमधील रहिवाशांना मुळ सदनिकांच्या क्षेत्रफळाप्रमाणे आम्हाला पुनर्वसनात घरे उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी रहिवाशांनी केली होती. आयुक्तांनी या मागणीचा विचार करून, अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुन्हा या विषयावर चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. आयुक्त डाॅ. जाखड यांनी पुन्हा बैठक न घेता आम्हाला डोंबिवलीतील पाथर्ली नाका येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील २६० चौरस फुटाच्या घरात घरे उपलब्ध करून दिली, अशी माहिती रहिवासी सुनील केदारे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
हेही वाचा : डोंबिवलीतील फडके रोडला झाडाच्या फांद्यांचा अडथळा; वाहतूक कोंडी, वीज पुरवठा खंडित
आमच्या माधव मधील सदनिका ४०० ते ५६० चौरस फुटाच्या आहेत. आम्ही तोकड्या जागेत पालिकेकडून घरे का घ्यायची, असे प्रश्न रहिवाशांनी केले. तेरा वर्षाच्या कालावधीत पालिका अधिकाऱ्यांनी आमच्या पुनर्वसन विषयात फक्त वेळकाढूपणा केला. आता आमचे म्हणणे एकून न घेता अचानक आम्हाला पाथर्ली येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे दिल्याची पत्रे दिली आहेत. हा आमच्यावर अन्याय आहे, असे रहिवाशांनी सांगितले.
पालिका अधिकाऱ्यांनी सुरूवातीला आम्हाला कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागात काही घरे दाखविली होती. त्याला आम्ही पसंती दिली होती. या घरांचा ताबा कधी मिळणार, अशी विचारणा आम्ही पालिकेकडून केली तेव्हा अधिकाऱ्यांनी ती घरे दुसऱ्यांची होती, ती विक्री झाली आहेत, अशी कारणे देऊन आमच्या तोंडाला पाने पुसली, असे केदारे यांनी सांगितले.
माधव इमारतीमधून बाहेर पडलेले १२ रहिवासी आणि सहा गाळेधारक सध्या भाड्यांच्या घरात राहत आहेत. भाडे भरून बहुतांशी रहिवासी हैराण आहेत. पालिकेकडून मनासारखी घरे मिळतील अशी अपेक्षा असताना पालिेकेने आम्हाला पाथर्ली येथील तोकडी घरे देऊन आमचा हिरमोड केला आहे, असे केदारे यांनी सांगितले.
रस्ते कामासाठी माधव इमारत तुटणार असल्याने आम्ही पालिकेला कधी विरोध केला नाही. आता आम्हाला आमच्या मागणीप्रमाणे घरे देणे हे पालिकेचे काम होते. ते त्यांनी दुर्लक्षित करून माधव इमारत तोडून आम्हाला बेघर करून स्वताचा कार्यभाग उरकून घेतला हे रहिवाशांवर अन्यायकारक आहे.
सुनील केदारे (रहिवासी, माधव इमारत, चिंचपाडा)