कल्याण : येथील पूर्व भागातील चिंचपाडा परिसरातील १०० फुटी रस्त्यावर सोमवारी संध्याकाळी रस्त्याने पायी चाललेल्या एका मुलीची टेम्पोमधून चाललेल्या तीन जणांनी छेड काढली. या मुलीने या तीन जणांना विरोध करून प्रत्युत्तर देताच ते टेम्पोतून खाली उतरून मुलीला दमदाटी करू लागले. हा प्रकार पादचारी नागरिक, या रस्त्याने जात असलेल्या आठ विद्यार्थ्यांच्या लक्षात आला. त्यांनी गटाने मिळून तीन जणांना पकडून चांगलाच चोप दिला. कोळसेवाडी पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात या तरूणांना दिले.
रोशन शर्मा, आशीषकुमार गौतम, कपील जयस्वाल अशी या तरूणांची नावे आहेत. कल्याण पूर्वेत एका बालिकेची हत्या विशाल गवळीने केल्यापासून शहरात संतापाची लाट आहे. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. विशाल गवळीला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी विविध स्तरातून मागणी होत आहे. हे माहिती असुनही तीन टवाळखोर तरूणांनी एका मुलीची कल्याण पूर्वेतील १०० फुटी रस्त्यावर छेड काढल्याने पोलसांनी या तरूणांना वर्दीचा झटका दाखवला.
हेही वाचा :डोंबिवलीत बेकायदा फलक लावणाऱ्या आस्थापनांवर फौजदारी गुन्हे, पाच हजार फलकांवर कारवाई
सोमवारी एक मुलगी १०० फुटीने रस्त्याने पायी चालली होती. तेथून एका टेम्पोतून तीन तरूण चालले होते. टेम्पोतून जात असताना रस्त्याने एकटीच मुलगी चालली आहे पाहून तिन्ही तरूणांनी मुलीची छेड काढली. या मुलीने तिन्ही तरूणांना प्रतिकार करताच, ते पुढे जाऊन टेम्पोतून उतरले. त्यांनी संघटितपणे तरुणीला दमदाटी करून तिला घाबरवण्याचा प्रयत्न केला. या तरूणांकडून आपल्या जीविताला धोका निर्माण झाल्याचे समजताच तरूणीने बचावासाठी ओरडा सुरू केला. तात्काळ या रस्त्याने जाणारे विद्यार्थी, नागरिक या तरूणीजवळ आले. तिने घडला प्रकार नागरिकांना सांगितला. त्यानंतर नागरिकांनी तिन्ही तरूणांना भर रस्त्यात तरूणांना बेदम चोप देत त्यांना कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे नागरिकही आता रस्त्यावर घडणाऱ्या घटनांविषयी जागृत झाले आहेत.