कल्याण : दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्रोत्सवासाठी गोविंदवाडी ते दुर्गाडी चौक रस्त्यावर वाहनांना सायंकाळच्या वेळेत प्रवेश बंदी लागू करण्यात आल्याने शहरात अभुतपुर्व कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण शहरात सकाळी ६ ते रात्री १२ यावेळेत अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. कल्याण पश्चिम भागात दोन दिवसांपासून वाहतूक कोंडीत होत आहे. रुग्णवाहिका आणि त्यामधील रुग्णांचे हाल होत आहेत. पाच मिनिटाच्या अंतरासाठी प्रवाशांना एक ते दीड तासांचा अवधी लागत आहे. याविषयीच्या तक्रारी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे आल्या आहेत.
सात दिवस दुर्गाडी किल्ल्यावर उत्सव सुरू राहणार असल्याने तेवढे दिवस शहर कोंडीत अडकणे योग्य नाही. यामुळे आमदार भोईर यांनी मंगळवारी पालिकेत एक बैठक घेतली. त्यावेळी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त मंदार धर्माधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : कल्याण डोंबिवलीकरांची रस्त्यावरील धुळीच्या लोटांपासून मुक्तता; धूळ शमनासाठी पालिकेकडून दोन वाहने कार्यरत
सायंकाळनंतर गुजरात, राजस्थान, नाशिककडून येणारी अवजड वाहने भिवंडी, पडघा गंधारे मार्गे कल्याण शहरात येतात आणि लालचौकी, शिवाजी चौकमार्गे पत्रीपूल दिशेने इच्छित स्थळी जातात. पुणे, रायगड, जेएनपीटी, नवी मुंबई भागातील अवजड वाहने शिळफाटा आणि शिवाजी चौक मार्गे इच्छित स्थळी जातात. या अवजड वाहनांची संथगतीने वाहतूक सुरू असते. त्यामुळे कोंडीत भर पडते. कल्याणमध्ये दोन दिवसापासून होत असलेल्या या कोंडीला अवजड वाहतूक कारणीभूत आहे, असे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पालिका, पोलिसांच्या बैठकीत सांगितले.
भिवंडी, पडघा, मुरबाड, शिळफाटा बाजुने येणारे एकही अवजड वाहन बंदी असलेल्या काळात कल्याणमध्ये येणार नाही याची काळजी घेण्याची सुचना आमदार भोईर यांनी वाहतूक विभागाला केली. या बैठकीतील चर्चेनंतर पालिका, पोलिस अधिकाऱ्यांनी कल्याणमध्ये सकाळी ६ ते रात्री १२ यावेळेत अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला. दुर्गाडी किल्ल्यावरील देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी फडके मैदान, शारदा मंदिर शाळा रस्त्यावर वाहने उभी करण्याची सुविधा वाढविणे. त्याचबरोबर पत्रीपूल, शिवाजी चौक, लालचौकी, आधारवाडी, दुर्गाडी चौक भागात कोंडी होणार नाही यासाठी या भागात अतिरिक्त वाहतूक पोलीस, सेवक तैनात करण्याची सूचना आमदार विश्वनाथ भोईर यांनी अधिकाऱ्यांना केली. फडके मैदान, लालचौकी जवळून भक्तांसाठी केडीएमटीची मोफत बस सेवा सुरू करण्याची सूचना भोईर यांनी केली. या निर्णयामुळे अवजड वाहनांना वळसा घेऊन आता ठाणे, मुरबाडमार्गे इच्छित स्थळी जावे लागणार आहे.