कल्याण : कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील लालचौकी येथील एका हाॅटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता. या हाॅटेलमध्ये एका महिले बरोबरच्या शरीरसंंबंधासाठी १५ हजार रूपये स्वीकारले जात आहेत, अशी माहिती मिळाल्यावर ठाणे येथील अनैतिक मानवी वाहतूक कक्ष गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी कल्याणमध्ये सापळा लावून संबंधित हाॅटेलमध्ये छापा टाकून चार पीडित महिला आणि हा वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या तीन जणांविरुध्द बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या वेश्या व्यवसाय प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे हवालदार विजय पाटील यांनी सुनिता गोरे, सरला भालेराव आणि विनोद मोर्या यांच्या विरुध्द अनैतिक मानवी प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

अनैतिक मानवी वाहतूक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना गुप्त माहिती मिळाली, की कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील लालचौकी भागात एका हाॅटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू आहे. यासाठी ग्राहकांना एकूण तीन म्होरके हा व्यवसाय करत आहेत. पीडित महिला शरीर संबंधासाठी उपलब्ध करून देत आहेत. एका ग्राहकाकडून हे तीन जण शरीर संबंधाच्या बदल्यात प्रत्येकी १५ हजार रूपये घेत आहेत. या माहितीची खात्री पटल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चौधरी यांनी आपले सहकारी पथक, बनावट ग्राहक, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे गस्तीवरील पोलीस यांच्यासह लालचौकी येथील संबंधित हाॅटेलच्या बाहेर सापळा लावून बसले. हाॅटेलमध्ये देण्यासाठी नोटांच्या झेराॅक्स काढून त्याची बनावट बंडले तयार करण्यात येऊन ती एका पिशवीत ठेवण्यात आली.

बनावट ग्राहक संबंधित हाॅटेलमध्ये गेल्यावर त्याने शरीर संबंधासाठी महिलेची मागणी केली. त्यांच्याकडून पिशवीत गुंडाळलेले पंधरा हजार रुपये म्होरक्या महिलांनी स्वीकारले. हा व्यवहार होताच बनावट ग्राहकाने बाहेर सापळा लावून बसलेल्या पथकाला इशारा केला. तात्काळ तपासणी पथक हाॅटेलमध्ये आले. त्यांनी उपस्थित ग्राहक, महिलांची चौकशी सुरू केली. म्होरक्या महिला या उल्हासनगर, वालधुनी कल्याण भागातील असल्याचे निष्पन्न झाले. बनावट ग्राहकाने दिलेली रक्कम या महिलांनी स्वीकारली होती. या महिला हाॅटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालवित असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या व्यवसायाच्या माध्यमातून झटपट अधिक रकमेचा पैसा मिळतो. गरजू पीडित महिलांना पैसे मिळतात म्हणून हा व्यवसाय करत असल्याचे म्होरक्या महिलांंनी तपासणी पथकाला सांगितले.