कल्याण : शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचा एक संचालक तथा सहसचिव चंद्रकांत हरिभाऊ धानके (६०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी शहा चंदुलाल स्वरुपचंद विद्यालय शाळेच्या समोरील बस थांंब्यावर एक लाख १० हजार रूपयांची लाच एका शिक्षकाकडून घेताना रंगेहाथ पकडले. ज्येष्ठ पत्रकार अरविंद उर्फ अप्पा भानुशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, तर त्यांचा मुलगा संतोष भानुशाली हे सचिव आहेत. या शैक्षणिक संस्थेचे शैक्षणिक उपक्रमांबद्दल यापूर्वी अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे. संचालक चंद्रकांत धानके यांच्या विरुध्द किन्हवली पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धानके हे राज्य परिवहन महामंडळातून निवृत्त झालेले बस वाहक आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेली माहिती अशी की, विद्या प्रसारक मंडळ संचलित शहा चंदुलाल स्वरुपचंद विद्यालयातील एक शिक्षक यापूर्वी काही कारणावरून संस्थेने निलंबित केला होता. त्यांना नंतर पुन्हा सेवेत दाखल करून घेण्यात आले होते. निलंबन काळातील या शिक्षकाची रोखण्यात आलेली वेतनवाढ पूर्ववत करण्यासाठी हा शिक्षक प्रयत्नशील होता. ही वेतनवाढ पूर्ववत करण्यासाठी तक्रारदार शिक्षकाकडून काही मागण्या संस्थेकडून करण्यात आल्या. चंद्रकांत धानके यांनी तक्रारदार शिक्षकाकडे एक लाख १० हजार रूपये दिले तर तुमचे काम होईल, असे सांगून त्यांच्याकडे लाचेची मागणी केली.

हेही वाचा : ठाणे स्थानकातील रिक्षा चालकांच्या बेशिस्तीला आळा बसणार

तक्रारदार शिक्षकाने या प्रकरणी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण यांना संपर्क केला. मिळालेल्या तक्रारीप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक महेश तरडे, गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक धर्मराज सोनक यांनी शिक्षकाच्या तक्रारीची खात्री केली. त्यात धानके हे लाच मागत असल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी चंद्रकांत धानके यांनी तक्रारदार शिक्षकाला एक लाख १० हजार रूपये शहा चंदुलाल स्वरुपचंद विद्यालयासमोरील बस थांब्याजवळ घेऊन येण्यास सांगितले. या बस थांबा भागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावला होता. धानके आपल्या मोटारीत बसून तक्रारदार शिक्षकाकडून एक लाख १० हजार रूपयांची लाचेची रक्कम स्वीकारत असताना पथकाने धानके यांना रंगेहाथ पकडले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan director of vidya prasarak mandal kinhavali caught red handed while accepting bribe css