कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका सेवेतील १० ते ३० वर्ष नोकरी केलेल्या दोन हजार ६८ सफाई कामगारांना आश्वासित योजनेचा लाभ देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. म्युनसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आम्हाला हा अनेक वर्षांनी न्याय मिळाला आहे, अशा भावना या योजनेचा लाभ मिळालेल्या सफाई कामगारांनी सांगितले.
मागील वर्षी लिपिक संवर्गातील सुमारे अडिचशेहून अधिक कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ प्रशासनाने दिला होता. अनेक वर्ष पालिका सेवेत असुनही विविध तांत्रिक कारणामुळे पदोन्नती न मिळालेल्या किंवा पदोन्नत्तीची पदे नसल्याने एकाच पदावर काम करून त्याच पदावर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ प्रशासनाकडून देण्यात येतो. म्युनसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाळ हरदास, कार्याध्यक्ष अजय पवार, उपाध्यक्ष सुरेश तेलवणे, सुनील पवार, सरचिटणीस सचिन बासरे आणि पदाधिकाऱ्यांनी पालिका सेवेतील १० वर्ष, २० वर्ष आणि ३० वर्ष सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना आश्वासित योजनेचा लाभ द्यावा म्हणून मागील दोन ते तीन वर्षापासून प्रशासनाकडे तगादा लावला होता.
आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, सामान्य प्रशासन उपायुक्त वंदना गुळवे, तत्कालीन साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकुर यांनी आश्वासित प्रगती योजनेची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी पात्र लाभार्थी कर्मचाऱ्यांची नावे, यादी निश्चित केली. आवश्यक प्रशासकीय पूर्ण करून आयुक्तांच्या आदेशाने दोन हजार ६८ सफाई कामगारांना या योजनेचा लाभ देण्यात आला.
उपाध्यक्ष सुरेश तेलवणे यांनी सांगितले, पालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांना जानेवारी २०१६ मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. या वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार १०, २० आणि ३० वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांंना विहित वेळेत पदोन्नत्ती किंवा त्या पदोन्नत्तीचा लाभ न मिळाल्याने त्यांची कुंठीतावस्था घालविण्यासाठी या योजनेचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणे बंधनकारक आहे.
म्युनसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने कल्याण डोंबिवली पालिकेतील दोन हजार ६८ सफाई कामगारांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा आदेश मंजूर केला आहे. प्रशासन लवकरच पात्र कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती करून त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना वेतन, निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतनात मिळणार आहे. १७ कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती, सेवेत कायम करून त्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या प्रक्रियेत आहेत. २४ वर्ष सेवेतील एलएसजीडी अनुत्तीर्ण, उपअभियंत्यांना योजनेचा दुसऱ्या लाभाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असे सरचिटणीस बासरे यांनी सांंगितले.
पालिकेत अनेक वर्ष सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना आश्वासित योजनेचा लाभ मिळावा म्हणून आमची संघटना प्रयत्नशील होती. प्रशासनाकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसाद आणि संघटनेच्या पाठपुराव्यामुळे अनेक वर्ष या योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या सफाई कामगारांना या योजनेमुळे न्याय मिळाला आहे. अशीच इतर विविध संवर्गातील ३६३६ प्रकरणे मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
सचिन बासरे, सरचिटणीस, म्युनसिपल कर्मचारी कामगार सेना.