कल्याण : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण, डोंबिवली परिसरात चोरट्या मार्गाने दारूची मोठ्या प्रमाणात उलाढाल वाढली आहे. टिळकनगर पोलीस आणि कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दोन ठिकाणी छापेमारी करून ३०० लिटरहून अधिक साठ्याची हातभट्टीची नवसागरयुक्त आणि विदेशी मद्य जप्त केले आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांचे पदाधिकारी झोपड्पट्टी, चाळी भागात रात्रीच्या वेळेत मद्य वाटून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रकार करतात. अनेक वर्ष हा प्रकार सुरू असल्याने निवडणूक काळात पोलीस यंंत्रणा अशा चोरट्या मद्याविषयी अधिक सतर्क असते.
या चोरट्या मद्य विक्रीप्रकरणी कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील माणेरे (उल्हासनगर जवळ) गावातील मद्य विक्रेता शैलेश भोईर आणि याच गावातील वाहतूकदार संजय जाधव (२०) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी टिटवाळा लोकलमध्ये शहाड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान एका प्रवाशाच्या पिशवीतून चोरून चालविलेल्या २०० विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंंढरी कांदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शहापूर जवळील खडवली भागात राहणाऱ्या नथुराम तांबोळी या इसमा विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा : ठाणे लोकसभेच्या जागेत संभ्रम कायम, उमेदवार अनिश्चितीमुळे महायुतीचा प्रचार थंडावला
कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी सांगितले, रविवारी मध्यरात्री उल्हासनगर जवळील माणेरे गावातून एक इसम गावठी मद्याचे फुगे घेऊन ९० फुटी रस्त्यावरील कचोरे गावात दारू विक्रीसाठी येणार आहे. ही माहिती हवालदार प्रशांत वानखेडे यांंना मिळाली होती. रविवारी मध्यरात्री तातडीने गुन्हे शाखेच्या पथकाने कचोरे गावाजवळील मोहन सृष्टी संकुलाच्या बाहेरील रस्त्यावर सापळा लावला. रात्री एक वाजण्याच्या दरम्यान आरोपी संजय जाधव दुचाकीवर मद्याच्या पिशव्या घेऊन कचोरे गावात वेगाने जात होता. पोलिसांनी त्याला अडविले. पोलिसांनी त्याची पिशवी उघडली, त्यात गावठी मद्याचा वास आला. पोलिसांनी त्याच्या पिशव्या तपासल्या सर्व पिशव्यांमध्ये फुग्यामध्ये ठेवलेली ३६ हजार रुपये किमतीची १६० लिटर नवसागरयुक्त गावठी दारू आढळली. ही दारू माणरे गावचे मद्य विक्रेते शैलेश भोईर यांनी आपणास कचोरे येथे विक्री करण्यासाठी पाठविले असल्याची माहिती जाधवने पोलिसांनी दिली. पोलिसांंनी दारू नष्ट करून संजय जाधवला अटक केली. त्याच्यावर टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
रेल्वेतून दारू विक्री
निवडणुकीच्या तोंडावर प्रतिबंधित वस्तू लोकलमधून वाहून नेण्यावर करडी नजर पोलिसांनी ठेवली आहे. सीएसएमटी-टिटवाळा लोकलमध्ये एक प्रवासी पिशवीत २०० हून अधिक विदेशी मद्याच्या बाटल्या घेऊन टिटवाळा येथे चालला होता. शहाड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान गस्तीवरील रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांंना संशय आला. त्यांंनी संशयित प्रवाशाची पिशवी तपासली. त्यात मद्य बाटल्या आढल्या. नथुराम तांंबोळी असे प्रवाशाचे नाव आहे. तो खडवली येथील रहिवासी आहे. या मद्याच्या बाटल्या कोठुन आणल्या. त्या कोणाला विकणार होता, याचा तपास लोहमार्ग पोलीस करत आहेत.