कल्याण, डोंबिवलीतील चारही मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आणि शिगेला पोहचला आहे. या प्रचारासाठी मतदारांच्या दारापर्यंत पोहचण्यासाठी तगडी प्रचारक कार्यकर्त्यांची फौज प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराकडे पुरेशा प्रमाणात नाही. प्रचारातील गर्दी दिसण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी चाळी, झोपड्यांमधील रहिवासी, कामगार नाका मजुरांना पहिल्या दिवसापासून रोजंंदारीवर घेऊन आपला प्रचार सुरू केला आहे.
आता प्रचार शिगेला पोहचला आहे. मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे. तशी प्रत्येक उमेदवाराची धाकधूक वाढली आहे. आपलाच प्रचार जोरात दाखविण्यासाठीची स्पर्धा उमेदवारांमध्ये सुरू आहे. त्यामुळे आपल्या प्रचार फेऱ्यांमधील गर्दी अधिक प्रमाणात दिसण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची धावपळ सुरू आहे.
पहिल्यासारखे निष्ठावान, उन्हातान्हात फिरणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रत्येक पक्षातील फौज आटली आहे. सतरंज्या, खुर्च्या लावणारे, उचलणारे कार्यकर्ते कमी झाले आहेत. आताच्या कार्पाेरेट कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या साहाय्याने आक्रमक प्रचार करणे अशक्य असल्याने उमेदवारांनी आपला सर्वाधिक भर मजुरीवर मिळणाऱ्या प्रचारकांच्या गर्दीवर दिला आहे. चाळी, झोपड्यांमधील रहिवासी, नाका कामगार यांच्या साहाय्याने उमेदवार प्रचारासाठी गर्दी जमवून आपल्या विधानसभा मतदारसंघात प्रचार फेऱ्या काढत आहेत.
प्रचारफेरीच्या पुढील भागात नेते, पदाधिकारी आणि त्यांच्या पाठीमागील रांगेत मजुरीवर आणलेले प्रचारक असे चित्र कल्याण, डोंबिवली, पूर्व, पश्चिम, ग्रामीण भागातील मतदारसंघात दिसत आहे. उमेदवारांनी दिवाळीनंतर प्रचाराला सुरूवात केली तेव्हा भाड्याने आणलेल्या प्रचारकांना ५०० रूपये दिवसाची मजुरी दिली जात होती. त्या सोबत वडा-समोसा पाव, पाण्याच्या बाटल्या. दुपारचे भोजन, चहा अशी सोय केली जात होती. महिलांना ५०० रूपये तर पुरूषांना ६०० रूपये मजुरी दिली जात होती. काही पुरूष मजुरांना रात्रीची श्रमपरिहाराची सोय करून देण्यात येत होती.
हे मजूर आणण्यासाठी काही ठराविक मंडळी विशेष प्रयत्नशील आहेत. मजुरांना एकगठ्ठा घेऊन येणारे प्रमुख मजुरांच्या मजुरीतून ५० रूपये परस्पर कापून घेत होते. हा प्रकार मजुरांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी प्रचारासाठी येण्यास पाठ फिरवली. या प्रकारामुळे अनेक उमेदवारांना भाड्याच्या प्रचारकांचा तुटवडा जाणवू लागला आहे. प्रचारासाठी अधिकची गर्दी दिसणे आवश्यक असल्याने उमेदवारांचे मजुरीवरील प्रचारक पळविण्याचे प्रकार कल्याण, डोंबिवलीत सुरू झाले आहेत. मजुर प्रचार पुरविणारे प्रमुख सकाळीच झोपड्या, चाळींच्या भागात जाऊन मजुरांनी आपल्या सोबत प्रचाराला यावे यासाठी तळ ठोकून बसतात.
प्रचारासाठी प्रचारक मजुरांची गरज वाढू लागली आहे. त्यात प्रचारक मजूर मिळणे दुर्मिळ झाल्याने उमेदवारांनी मजुरांना आता ८०० रूपये ते १२०० रूपये रोजची मजुरी देणे सुरू केली आहे. पुरूष प्रचारकांना मजुरी आणि त्यांच्या मागणीप्रमाणे रात्रीची श्रमपरिहाराची सोय करून देण्यात येते, अशी माहिती एका उमेदवाराच्या प्रचार प्रमुखाने दिली. गेल्या २० दिवसांपासून दररोज विनाव्यत्य खूप मेहनत न घेता मजुरी मिळत असल्याने प्रचारक मजुरांमध्ये खुशीचे वातावरण आहे.