कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत बेसुमार बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. या बेकायदा इमारतींची बनावट कागदपत्रे तयार करून त्या माध्यमातून घर खरेदीदारांची अधिक प्रमाणात फसवणूक होत असल्याच्या तक्रारी शासनाकडे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण, डोंबिवलीतील बेकायदा इमारतींमधील सदनिकांची दस्त नोंदणी सह दुय्यम निबंधकांनी करू नये, असे मुद्रांक व नोंदणी विभागाचे आदेश आहेत. हे आदेश डावलून कल्याण, डोंबिवलीतील पाचही दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये काही दलालांच्या माध्यमातून गुपचूप बेकायदा इमारतींमधील सदनिकांची दस्त नोंदणी केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
याविषयी फसवणूक झालेल्या घर खरेदीदार, काही जागरूक नागरिकांनी याविषयी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे, ठाणे विभागाकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. पुणे येथील नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी कोकण विभागाच्या नोंदणी उपमहानिरीक्षकांना पत्र पाठवून कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये सह दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये बेकायदा इमारतींमधील सदनिकांची होत असलेली दस्त नोंदणीची चौकशी करावी. नियमबाह्य दस्त नोंदणी ऐवज रद्द करावेत. सहभागी सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. असेच आदेश ठाणे जिल्हा निबंधक सुरेश चाकरे यांनी कल्याणमधील सह दुय्यम निबंधक कार्यालयाला दिले आहेत.
हेही वाचा : लाडकी बहीणींना योजनेचा अर्ज घ्यावा लागतोय विकत, दुकानदारांकडे हे अर्ज कसे पोहोचले असा प्रश्न उपस्थित
बेकायदा इमारतींमधील सदनिका व्यवहारांमधून सामान्य घर खरेदीदारांची अधिक प्रमाणात फसवणूक होत असल्याने नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांंक नियंत्रक विभागाने कल्याण, डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांचे आगर असलेल्या २७ गाव आणि इतर भागाची दस्त नोंदणी पूर्णपणे बंद केली आहे. भूमाफिया, कल्याण, डोंबिवलीतील दस्त नोंदणी कार्यालयातील काही दलाल अधिकारी, लिपिकांना हाताशी धरून बेकायदा इमारतींमधील सदनिकांची दस्त नोंदणी करत आहेत. एक बेकायदा सदनिकाची दस्त नोंदणी करण्यासाठी सुमारे दीड लाख ते अडीच लाख रूपये घर खरेदीदाराकडून दलालाकडून उकळले जात असल्याच्या तक्रारी आहेत.
बेकायदा इमारतीचीं कागदपत्रे दस्त नोंदणीकृत झाली की त्या आधारे भूमाफिया या इमारतीमधील सदनिका बनावट कागदपत्रांच्या आधारे सामान्यांना २५ ते ३० लाख रूपयांना विकतात. असे गुपचूप व्यवहार दोन वर्षापासून कल्याण डोंंबिवली पालिका हद्दीत सुरू आहेत. ‘लोकसत्ता’ने दोन वर्षापूर्वी बेकायदा दस्त नोंदणी प्रकरण बाहेर काढून याप्रकरणात शासनाकडून झालेल्या चौकशीत दोषी आढळल्याने कल्याणमधील सह दुय्यम निबंधक जी. बी. सातदिवे निलंबित झाले होते.
हेही वाचा : कल्याण: किन्हवली येथील विद्या प्रसारक मंडळ संस्थेचा संचालक लाखाची लाच घेताना अटकेत
डोंबिवलीतील सागाव नांदिवली पंचानंद येथील राधाई काॅम्पलेक्स मधील सदनिका भूमाफियांनी घर खरेदीदारांना दस्त नोंदणी पध्दतीने विकल्या आहेत. आयरेतील साई रेसिडेन्सी, कोपरमधील गट क्रमांक २६-१४ ते २६-१६ (अ) इमारतींमधील सदनिकांची बेकायदा दस्त नोंदणी करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी नोंदणी उपनिरीक्षक उदयराज चव्हाण, सह जिल्हा निबंधक सुरेश चाकरे, सह दुय्यम निबंधक सचिन आरेकर यांना संपर्क केला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
आमच्या कार्यालयाकडून यापूर्वी किंवा आता कोणत्याही प्रकारच्या बेकायदा बांधकामांमधील कागदपत्रांची दस्त नोंदणी केली जात नाही. तसे होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
दिलीप आव्हाड (सह दुय्यम निबंधक, कल्याण)