कल्याण – कल्याण, डोंबिवलीतील विधानसभा मतदारसंघांमध्ये आपणच शिवसेनेचे उमेदवार, अशा अविर्भावात शहरात मिरविणाऱ्या आणि आपणास शिवसेना नेत्यांचा पाठिंबा आहे, असा आव आणाऱ्या कल्याण, डोंबिवलीतील शिवसेना इच्छुक उमेदवारांची खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी चांगलीच शाळा घेतली. जोपर्यंत महायुती किंवा पक्ष अधिकृत उमेदवारी जाहीर करत नाही तोपर्यंत कोणीही शहरात आपणच शिवसेनेचे उमेदवार अशा अविर्भावात मिरवू नये, अशी तंबी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी शनिवार, रविवार मुंंबईत वर्षा निवासस्थानी झालेल्या कल्याण, डोंबिवलीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या इच्छुकांना दिली.
या बैठकीला उपस्थित असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर ही माहिती दिली. ही तंबी मिळणाऱ्यांमध्ये कल्याण पूर्वेतील दोन, कल्याण पश्चिमेतील दोन, डोंबिवलीतील दोन पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेने कोणतेही संकेत दिले नसताना कल्याण पूर्वेत शिवसेनेचे दोन माजी नगरसेवक आपणच कल्याण पूर्व भागाचे उमेदवार अशा थाटात वावरत आहेत. सण, उत्सव काळातील या नगरसेवकांच्या फलक कमानींवर भावी आमदार, कार्यसम्राट, विकास पुरुष वगैरे भव्य शब्द वापरून त्यांचा गवगवा केला जात आहे. या इच्छुकांच्या उमेदवारीवरून स्थानिक पातळीवर शिवसेनेत धुसफूस सुरू झाली आहे. भाजपचे स्थानिक पदाधिकारीही या सगळ्या प्रकाराने वरिष्ठांकडे नाराजी व्यक्त करत आहेत.
हेही वाचा – ठाण्याचे ‘प्रभाव’शून्य पोलीस आयुक्त महायुतीला आता हवेहवेसे
हा विषय दोन दिवसांच्या मुंबईतील शिवसेनेच्या बैठकीत उपस्थित झाला. त्यावेळी खा. डाॅ. शिंदे यांनी महायुतीकडून अधिकृत उमेदवार जाहीर होत नाही, तोपर्यंत कोणीही इच्छुक म्हणून आपला स्वत:हून प्रचार करू नये. जो उमेदवार महायुतीकडून दिला जाईल, त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी ताकदीने काम करायचे आहे, असा सल्ला दिला. डोंबिवलीत शिवसेनेच्या एका युवा नेत्याने भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांना उघड आव्हान देऊन महायुतीमध्ये अस्वस्थता, अराजकतेचे वातावरण निर्माण करण्यास सुरूवात केली होती. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. हा युवा नेता महायुती धर्म तोडून उमेदवारीसाठी एवढे तांडव करत असताना शिवसेनेकडून त्याची कानउघडणी होत नव्हती. त्यामुळे भाजपचे प्रदेश, डोंबिवलीतील स्थानिक पदाधिकारी संतप्त होते.
वाचा – Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कसा झाला? आता सीआयडी करणार तपास!
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या आदल्या मध्यरात्री उल्हासनगरच्या जाॅली प्रिंटर्सने ‘२० सप्टेंबर.. हॅप्पी खड्डे, डोंबिवलीकर ’ असा मजकूर असलेले फलक डोंंबिवली शहरभर लावून मंत्री चव्हाण यांच्या वाढदिवसाची टवाळी करण्याचा, समाजात तेढ निर्माण करून शहराचे विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात प्रिंटर्स विरुद्ध गुन्हा दाखल झाला. या तपासात शिवसेनेच्या एका युवा नेत्याने हे सर्व घडून आणल्याचे निष्पन्न झाले. हा सर्व प्रकार शिवसेनेच्या वरिष्ठांंपर्यंत गेला. यावरून भाजप, शिवसेनेत खडाखडी झाली. त्यानंतर सावध झालेल्या खा. शिंदे यांनी कल्याण, डोंबिवलीतील शिवसेनेतील इच्छुकांची खड्या शब्दात कानउघडणी केली. त्यामुळे इच्छुकांना आपला सामाजिक, विकास कामांचा कारभार आवराता घ्यावा लागणार आहे. डोंबिवलीतील प्रकरणाने युवा नेत्याचा आमदार नाहीच, पण पालिकेतील महापौर शर्यतीमधील पत्ता कट झाल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये होती.