कल्याण : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक ते मुरबाड रस्ता भागात कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे सुरू आहेत. या कामातील महात्मा फुले चौक ते सुभाष चौक (बाईचा पुतळा) दरम्यानची कामे स्मार्ट सिटी विभागाने शनिवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामात अडथळा नको म्हणून स्मार्ट सिटी विभागाच्या सूचनेवरून कल्याणच्या वाहतूक विभागाने कल्याण शहरातील मुरबाड रस्त्याची कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाकडे येणारी एक मार्गिका वाहतुकीसाठी बंद केली आहे.
ही मार्गिका बंद केल्याने मुरबाड, शहाड, उल्हासनगर, विठ्ठलवाडी आणि शहराच्या विविध भागातून मुरबाड रस्त्याने कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या वाहनांना पर्यायी रस्त्याने जाण्याचे वाहतूक विभागाने सुचविले आहे. शनिवारी सकाळी हा रस्ता अचानक बंद करण्यात आल्यानंतर मुरबाड रस्ता आणि परिसर वाहतूक कोंडीत अडकला.
मुरबाड रस्ता सुभाष चौक-बाईचा पुतळा भागात वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या जड, अवजड, एसटी बस, लक्झरी बस, प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस चालकांना शहाड येथील वैकुंठधाम स्मशानभूमी समोरील प्रेम ऑटो चौक, बिर्ला महाविद्यालय, खडकपाडा सर्कल, आधारवाडी, दुर्गाडी किल्ला, गोविंदवाडी वळण रस्ता, पत्रीपूल, बैलबाजार, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती, गुरूदेव हाॅटेलमार्गे कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील एसटी बस आगार, किंवा इतर वाहन थांब्यावर येतील. काही वाहने पत्रीपुलावरून इच्छित स्थळी जातील, असे वाहतूक विभागाने सूचित केले आहे.
मुरबाड रस्ता कल्याण रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या वाहनांसाठी बंद करण्यात आल्याने वाहन चालक संतोषी माता रस्ता, रामबाग गल्ली, सहजानंद चौक, अंतर्गत गल्ल्यांमधून रेल्वे स्थानकाकडे येत आहेत. हा रस्ता बंद करण्यात आल्याने सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्या आणि संध्याकाळी कामावरून सुटणाऱ्या प्रवाशांचे सर्वाधिक हाल होण्यास सुरूवात झाली आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी सांगितले, महात्मा फुले चौक ते सुभाष चौक दरम्यानची स्मार्ट सिटी प्रकल्पातील उड्डाण पुलाच्या पुढील टप्प्याचे काम हाती घेण्यात येत आहे. याठिकाणी रस्त्याला वाक आहे. त्यामुळे जोखमीचे असे काम पावसाळ्यापूर्वी लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. वाक असलेल्या रस्त्याच्या ठिकाणी तुळया वरील भागात तयार करून आहे त्याठिकाणी स्थानापन्न केल्या जाणार आहेत. ही कामे हाती घेण्यात आल्याने मुरबाड रस्ता बंद करण्याची सूचना वाहतूक विभागाला केली होती. मुरबाड रस्ता बंदचा शहरातील इतर वाहतुकीला फटका बसू नये म्हणून शहरातील मुख्य रस्ते, चौक भागात वाहतूक पोलिसांनी वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.