कल्याण : कल्याण – डोंबिवली पालिका हद्दीत रस्तोरस्ती स्थानिकांनी फटाके विक्रीची बेकायदा दुकाने थाटली आहेत. ही दुकाने वाहतुकीला, पादचाऱ्यांना अडथळा होईल अशा पध्दतीने सुरू करण्यात आली आहेत. यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याबरोबर शहरातील अग्निसुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. शहरातील रस्ते, वर्दळीचे परिसर, गल्लीबोळात आणि गजबलेल्या बाजारपेठांमध्ये पालिका, पोलीस फटाके स्टाॅलना परवानगी देत नाहीत. तरीही कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, शहाड, आंबिवली रेल्वे स्थानकांच्या परिसरात बेकायदा स्टाॅल उभारण्यात आले आहेत.
स्टाॅलवर कारवाई होऊ नये यासाठी फटाके स्टाॅलवरील फलकांवर राजकीय मंडळींच्या छब्या लावण्यात आल्या असून यातून आम्हाला राजकीय आशीर्वाद असल्याचा संदेश विक्रेत्यांनी पालिका, पोलिसांना दिला आहे. दिवाळीच्या २० दिवसांच्या कालावधीत फटाके विक्रीच्या माध्यमातून कमाई करता येते. या विचारातून काही राजकीय मंडळींच्या कार्यकर्त्यांनी डोंबिवली, कल्याण मधील वर्दळीचे रस्ते अडवून फटाके स्टाॅल उभारणीस सुरूवात केली आहे.
हेही वाचा : हे व्हीआयपी कल्चर आम्हाला मान्य नाही; खासदार श्रीकांत शिंदे यांची भूमिका
डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीत विष्णुनगर जुन्या पोलीस ठाण्यासमोरील इमारती जवळ शिधावाटप दुकान आहे. याठिकाणी रिक्षा वाहनतळ आहे. रेल्वे स्थानकासमोरील मुख्य वर्दळीचा हा रस्ता आहे. याठिकाणी डोंबिवली ग्रंथसंग्रहालय, मासळी बाजार आहे. याठिकाणी काही विक्रेत्यांनी शिधावाटप दुकानाच्या बाहेर वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने फटाके स्टाॅल उभारला आहे. अशाच पध्दतीने गुप्ते रस्ता, दिनदयाळ रस्ता, फुले रस्ता, पूर्व भागात फ प्रभागात फडके रस्ता भागात, कल्याण पूर्व, पश्चिम भागातील वर्दळीचे रस्ते अडवून विक्रेत्यांनी स्टाॅल उभारणी केली आहे. रस्तोरस्ती उभारण्यात आलेले स्टाॅल वाहतुकीला अडथळा ठरत असुनही स्थानिक पालिका, पोलीस, वाहतूक यंत्रणा याविषयी कोणतीही आक्रमक भूमिका घेत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
बेकायदा स्टाॅल हटविणार
पालिका हद्दीत एकही बेकायदा फटाक्यांचा स्टाॅल उभा राहणार नाही. नागरी वस्तीला धोका होईल अशी कोणतीही कृती पालिका प्रशासन सहन करणार नाही. वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने उभे केलेले स्टाॅल हटविण्यात येतील. फटाक्यांचे स्टाॅल कुठे असावेत. त्याविषयीच्या नियमावलीप्रमाणे फटाके स्टाॅलवर कारवाई करण्यात येणार आहे, असे एका वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा : डोंबिवलीत तीन तासांपासून कोंडीत अडकून पडली वाहने
“ पालिका हद्दीतील फटाके स्टाॅलला पोलीस, अग्निशमन विभागाची परवानगी आहे की नाही याची तपासणी मोहीम प्रभागातील साहाय्यक आयुक्तांकडून सुरू केली जाईल. ज्या फटाके विक्रेत्यांकडे अशाप्रकारची परवानगी नाही, त्यांना तातडीने स्टाॅल हटविण्याची सूचना केली जाईल. त्यांनी स्टाॅल हटविले नाहीतर अग्निशमन विभागाचे वाहन शहरात फिरवून संबंधित फटाके स्टाॅ्लवर पाण्याचे फवारे मारून ते स्टाॅल तेथून हटविले जातील”, असे कल्याण डोंबिवली पालिकेचे अध्यक्ष डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी म्हटले आहे.